हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी आजतागायत अनेक दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. ‘टाईमपास’ ते ‘ताली’ अशा प्रत्येक कलाकृतीत त्यांनी स्वतःची अनोखी छाप सोडली आहे. यामुळे दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यांचा वेगळा चाहता वर्ग आहे. जो त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत नेहमीच आतुर असतो. रवी जाधव सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आज लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी काही अनसीन फोटोज शेअर केले आहेत. जे व्हायरल होत आहेत.
निर्माते आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी ५ डिसेंबर १९९८ रोजी मेघना यांच्याशी लग्नगाठ बांधली. यानुसार आज त्यांच्या लग्नाचा २५’वा वाढदिवस आहे. यानिमित्त रवी जाधव यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर बायकोसोबतचे काही या अनसीन फोटोज शेअर केले आहेत. सोबत एक सुंदर कॅप्शनदेखील लिहिलं आहे. रवी यांनी म्हटलंय कि, ‘माझ्या घरात मी बॉस आहे आणि माझी पत्नी निर्णय घेणारी आहे. आमच्या दोघांसाठी सर्वोत्तम निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद.. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!!’ रवी जाधव यांच्या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
रवी आणि मेघना यांची लव्हस्टोरी एकदम फिल्मी आहे. रवी जाधव यांची पत्नी त्यांच्या जवळच्या मित्राची बहीण आहे. मित्राच्या घरी येणं- जाणं असताना रवी- मेघनाची प्रेमकहाणी सुरु झाली. दरम्यान, रवी यांनी १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’दिवशी मेघना यांना लग्नाची मागणी घातली होती. पूर्ण १ महिना विचार करून मेघना यांनी होणार दिला. पण मेघनाच्या वडिलांनी लग्नापूर्वी रवी यांना स्वत:चं घर घेण्याची अट टाकली.
सासऱ्यांची अट मान्य करून रवी यांनी स्वत:चं घर उभं केलं आणि त्यानंतर मेघनाशी लग्न. अशा या प्यारवाली लव्हस्टोरीसोबत रवी आणि मेघना यांचा संसार २५ वर्षाचा झाला असून त्यांना २ मुलंदेखील आहेत. सिनेविश्वातील खुशमिजास आणि कुल जोडी अशी त्यांची ओळख आहे.