रवी जाधवांनी यंदाही घडवला इको गणेश; म्हणाले, ‘..जय्यत तयारी सुरु आहे’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. आता काही दिवसांतच बाप्पा येईल आणि उत्साहाचा जल्लोष साजरा केला जाईल. दरवर्षी सर्वसामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटी मंडळींच्या घरी बाप्पा विराजमान होतो. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या घरी सालाबादप्रमाणे यंदाही इको गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी स्वहस्ते गणपती बाप्पाची मूर्ती घडवली आहे. याचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केलाय. जो व्हायरल होतो आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्याकडे दरवर्षी गणपती बाप्पा विराजमान होतो. तर यंदाची तयारी एकदम जोरदार सुरु आहे. नुकताच रवी जाधव यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर गणेश मूर्ती बनवतानाचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये रवी जाधव स्वतःच्या हाताने सुंदर आणि सुबक गणेशमूर्ती साकारताना दिसत आहेत. शाडूच्या मातीचा बाप्पा बनवताना त्यांच्या चेहऱ्यावरील हर्षोल्लास पाहण्याजोगा आहे.

या व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘अनेक वर्षे झाली आम्ही घरातच बाप्पांची छोटीशी मुर्ती तयार करतो. या वर्षी त्यात एक छोटासा बदल केलाय. मुर्तीचा एक साचा ऑनलाईन मिळाला. त्यात शाडूची माती भरुन एक सुबक मुर्ती तयार झाली. आता त्यावर थोडे बारीक फाईन ट्युनिंग सुरु आहे. त्यानंतर रंगकाम. ते झाल्यावर नक्कीच शेअर करीन!!! गणपती बाप्पा मोरया!!’ रवी जाधवांप्रमाणे अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा विराजमान होतो आणि इको गणेशोत्सव साजरा करण्यात त्यांचाही सहभाग आहे.