हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटांतून कौटुंबिक भावविश्व उलगडून दाखवण्याचे शेकडो प्रयत्न यापूर्वी झाले. फक्त महिलांच्या नात्यांतील भूमिका केंद्रबिंदू ठेवूनसुद्धा (उदा. सासू-सून, आई-लेक, बहिणी-बहिणी) काही चित्रपट तयार झाले. माहेरची साडी, लेक चालली सासरला या चित्रपटांनी तर अनेकांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर बाहेर काढला. वास्तव जगणं रुपेरी पडद्यावर पाहण्याचा अनुभव अशा चित्रपटांनी लोकांना दिलाच होता. टीव्ही चॅनेलवरील मालिकांनी सुद्धा याच स्वरूपात कमी-अधिक बदल करून आपलं दुकान वर्षानुवर्षे चालवलं. काळानुसार यात बदलही पाहायला मिळाले. जाच करणाऱ्या सासूच्या ऐवजी रोजच्या जगण्यातल्या गरजेच्या गोष्टी, पिढीनुसार बदललेल्या गरजा यावर बोलणं या मालिकांतून होऊ लागलं. अगदी हाच ट्रेंड चित्रपटांतही दिसू लागला. वेगवेगळ्या महिला एकत्र येऊन आपापल्या आयुष्याची कहाणी कशी पुढे नेतायत हे दाखवणारा झिम्मासारखा चित्रपट याचंच एक उदाहरण. याच बदलत्या टप्प्यावरील पुढचा चित्रपट म्हणजे बाईपण भारी ग देवा..!
काही चित्रपट असे असतात की त्यांच्या नावातूनच आपल्याला त्या चित्रपटाच्या विषयाचा, कथेचा अंदाज आलेला असतो. आपण तो चित्रपट बघायला जातो आणि आपल्याला तो मनापासून आवडतोसुद्धा. “बाईपण भारी देवा” हा चित्रपटही अगदी तसाच..! चित्रपटाचं खूप कौतुक करण्याआधी सर्व-स्त्री पुरुषांना हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील जवळच्या स्त्रीच्या जगण्यामध्ये डोकवायला लावेल, काही आठवणी जाग्या करेल हे आवर्जून सांगावं लागेल… केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब-चौधरी या सहा मुरलेल्या कलाकारांच्या अभिनयाने सजलाय.
सहा सख्ख्या बहिणींच्या आयुष्याची, त्यांची एकमेकींशी असणाऱ्या नात्याची गोष्ट लेखिका वैशाली नाईक यांनी साध्या, सोप्या पद्धतीने मांडलीय. हा चित्रपट म्हणजे आपलं रोजचं जगणं आहे याची कबुली चित्रपट पाहिलेली प्रत्येक महिला निःसंशय देईलच. चित्रपटाची कहाणी जितकी दमदार आहे तितकीच सुंदर चित्रपटातील गाणी आहेत. गाण्यांच्या माध्यमातून कौटुंबिक वातावरणात रमवण्याचं श्रेय साई- पियूष या संगीतकार जोडीला द्यावं लागेल.
बायकांचं एकुणातील जगणं हे फक्त तिच्यापुरतं असं कधीच नसतं. चूल, मुल, नोकरी या सगळ्या कसरती असल्या तरी बाई तिच्या संवेदनशील स्वभावामुळे अनेक अनुभव, आठवणी मनातच साठवून वावरत असते. लग्न होण्यापूर्वी घरच्या जबाबदाऱ्या आणि लग्नानंतर स्वतःसोबत माहेर, सासर, करिअर या जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना बरीच कसरत करावी लागते. इच्छा असो वा नसो जबाबदारीतून सुटका नाही. बरं या सगळ्याची किरकिर करायचीही सोय नाहीच. कारण त्यातून प्रत्येकवेळी पर्मनंट सोल्युशन मिळेल असं नाही. परिस्थितीनुसार कुटुंबावर येणाऱ्या सगळ्याच संकटांना ताकदीने सामोरं जाण्याची किमया महिला करत असतात. हे करत असताना अनेकदा अवघडलेपण येतं, थकायला होतं, मन मारावं लागतं, आपल्याच लोकांसमोर उगाच सुखी असण्याचा दिखावा करावा लागतो. आणि बऱ्याचदा याची दखल घेणारं, आपुलकीने विचारपूस करणारं कुणीही जवळपास नसतं. या टप्प्यावरच्या भाव-भावनांचा नेमकेपणाने ठाव घेण्याचं काम या चित्रपटाने केलं आहे.
या चित्रपटातील सहा जणींच्या आयुष्यात प्रत्येकीच्या मनाचा एक दुखरा कोपरा आहे. एकमेकींबद्दल मनात काही कडूगोड आठवणी आहेत. रुसवे – फुगवे, आहेत. राग,अबोला आहे. या सगळ्यामुळे त्यांच्या नात्यात बराच दुरावा सुद्धा आलाय. हा दुरावा नेमका कसा दूर होतो? आपल्या आयुष्याला त्यातील नेमकी कोणती गोष्ट रिलेट होते हे चित्रपट पाहूनच तुम्हाला ठरवावं लागेल. हा चित्रपट आपल्याला बाईच्या असण्याची, तिच्या संघर्षाची नोंद घ्यायला भाग पाडतो. यातल्या बायका स्वतःला नव्याने गवसतात, जिंकतात. आपला हरवलेला आत्मविश्वास, संपलेली ताकद, नाहीसा झालेला आदर, दुखावलेला स्वाभिमान, दुरावलेली नाती या सगळ्या गोष्टी त्या पुन्हा मिळवतात आणि स्वतःशी, एकमेकीशी नव्याने जोडल्या जातात. महिलांकडे संवेदनशीलपणे आणि आस्थेने बघण्याची दृष्टी या चित्रपटातून मिळते. शिवाय त्यांच्याप्रति असलेली कृतज्ञतेची जाणीव करून द्यायलाही चित्रपट मदत करतो.
नेहमीच्या रुटिन आयुष्यामधून स्वतःसाठी एक रिफ्रेशमेंट म्हणून हा चित्रपट आवर्जून पाहायला हवा. असे हलकेफुलके चित्रपट आपलं मनोबल वाढवतात शिवाय मानवी नात्यांना घट्ट करण्याची एक संधीही देतात. “झिम्मा” नंतर महिलांसाठी हा तसा हक्काचा चित्रपट आहे. पण म्हणून पुरुषांनी नाराज होऊ नका. बायकांशिवाय आपलं जीवन अधुरं आहे याची जाणीव ठेवून तुम्हीसुद्धा आवर्जून हा चित्रपट बघायला जा. बाईपणाच्या निमित्ताने तुम्ही स्वतःचं माणूसपण एन्जॉय कराल याची खात्री आहे..!
परीक्षण – विभावरी नकाते