‘माझ्याबरोबर दीपा तुम्ही सुद्धा जगलात..’; ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदेची भावनिक पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. तब्बल ४ वर्षांनंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. प्रत्येकवेळी एक नवा ट्विस्ट घेऊन २०१९ पासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात लोकप्रिय ठरले. या मालिकेतील दीपा या पात्रावर प्रेक्षकांचे विशेष प्रेम होते. हे पात्र साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे मालिका संपल्यानंतर भावुक झालेल्या रेश्माने एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून रेश्माने हि पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने दीपा या पात्राचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘येते हा.. जाते नाही, येते म्हणावं नाही का..? हा निरोप नाही तर पुन्हा नव्या रुपात येण्याची नांदी आहे, असं मी म्हणेन… या ना त्या वेगळ्या रुपात तुम्हाला नक्की भेटायला येईन. अशीच सकारात्मक ऊर्जा घेऊन.. कलर गया तो पैसा वापस… धन्यवाद ‘’स्टार प्रवाह’, सतीश राजवाडे, मोनिका रणदिवे, शमा सय्यद तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि मला संधी दिल्याबद्दल…’

‘हर्षदा खानविलकर , आशुतोष गोखले तुमच्याशिवाय दीपा अपूर्णच… अतुल केतकर, अर्पणा केतकर, चंद्रकांत गायकवाड, अभिजीत गुरू तुमचे खूप धन्यवाद. माझ्याबरोबर दीपा तुम्ही सुद्धा जगलात. लेक सासरी जाते तेव्हा तिला लेकीप्रमाणे तसंच प्रेम माया मला दिल्याबद्दल धन्यवाद आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार!! या प्रवासात हात घट्ट धरून ठेवलात.. असेच आशीर्वाद राहू दे.. येते…’. ‘रंग माझा वेगळा’ हि मालिका संपल्यानंतर आता त्याजागी आजपासून तेजश्री प्रधान, राज हंचनाळे आणि अपूर्वा नेमळेकर यांची ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. या मालिकेत शुभांगी गोखले आणि संजीवनी जाधवदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.