हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीने प्रचंड जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटील हे याच मागणीसाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यामुले राज्यभरातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्या आंदोलनाला अनेक सेलिब्रिटी मंडळींनी पाठींबा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये अभिनेता रितेश देशमुख याचाही समावेश आहे.
जय शिवराय,
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो. 🙏🏽 pic.twitter.com/Qffzej8Y4k— Riteish Deshmukh (@Riteishd) October 30, 2023
मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाचा पुढचा टप्पा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी, तसेच कलाविश्वातील अनेक कलाकारांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता रितेश देशमुखने यासंदर्भात अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्वीटरवर (एक्स) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ट्विटमध्ये रितेश देशमुखने लिहिले आहे कि, ‘जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो’.
रितेश देशमुखने शेअर केलेल्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी ‘जय शिवराय!!’ म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. यावर एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘जय शिवराय दादा!! आपण समाजासाठी व्यक्त झाला बरं वाटत आहेत’. तसेच आणखी काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे कि, ‘एक मराठा… लाख मराठा..’. तर काही नेटकऱ्यांनी रितेशला मनोज जरांगे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घ्या… असा सल्ला दिला आहे.