रितेश- जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाला 1 वर्ष पूर्ण; अभिनेत्याने खास व्हिडीओ शेअर करत भावना केल्या व्यक्त


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच हिंदी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडपे म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख. रितेश- जिनिलिया कायम त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. आज ३० डिसेंबर २०२३ आणि आजचा दिवस या दोघांसाठी फार खास आहे. कारण रितेश आणि जिनिलियाच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘वेड’ चित्रपटाने आज १ वर्ष पूर्ण केले आहे. गेल्या वर्षी ३० डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रेक्षकांचा होऊन गेला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.

‘वेड’ हा केवळ चित्रपट सुपरहिट झाला नाही. तर या चित्रपटातील गाणीदेखील प्रचंड गाजली. आजही या चित्रपटातील गाणी रिल्समध्ये पहायला मिळतात. ‘वेड’ या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शक म्हणून, तर जिनिलीयाने मराठी अभिनेत्री म्हणून एक पाऊल पुढे टाकलं. दोघांचाही पदार्पण यशस्वी झालं आणि त्यांच्या ‘वेड’ चित्रपटाने प्रत्येकाला वेड लावलं. आज ‘वेड’ चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रितेश देशमुखने एक खास पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओत त्याच्या आईच्या हस्ते सेटवर मुहूर्ताचा शॉट पार पडल्याचं दिसत आहे. हा शॉट ‘सुख कळले’ या लोकप्रिय गाण्याचा होता. आईच्या हस्ते शुभारंभ, तर थोरल्या रियानवर ‘अ‍ॅक्शन’ आणि धाकट्या राहिलवर कट बोलण्याची जबाबदारी रितेशने दिली होती. या व्हिडिओसोबत व्यक्त होताना रितेशने लिहिलं कि, ‘हे सगळंच अविश्वसनीय होते. कधी एक वर्ष पूर्ण झालं समजलंच नाही. गेल्यावर्षी आम्ही दोघंही या दिवसात थोडेसे दडपणाखाली होतो परंतु, त्यानंतर तुमच्याकडून मिळालेलं प्रेम पाहून धन्य झालो. तुमचीच टीम ”वेड”. रितेशच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून अनेक नेटकरी ‘वेड- भाग २’ यावा अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत.