‘लढा सुरु आहे….’; ‘होणार सून मी ह्या घरची’ फेम अभिनेत्याची पत्नी करतेय ब्रेस्ट कॅन्सरशी दोन हात


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीची अत्यंत गाजलेली ‘होणार सून मी ह्या घरची’ हि मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर मुख्य भूमिकेत होते. त्यांची श्री आणि जान्हवीची जोडी अत्यंत गाजली. या पात्रांसह मालिकेतील अन्य पात्र देखील तुफान गाजली. त्यांपैकी एक म्हणजे जान्हवीचा भाऊ पिंट्या. हि भूमिका अभिनेता रोहन गुजरने साकारली होती. सध्या रोहन त्याच्या वैयक्तिक आयुष्यात संघर्षाला सामोरं जात आहे. रोहनची पत्नी स्नेहलला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. याविषयी तिने स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. जी व्हायरल होत आहे.

अभिनेता रोहन गुजरची पत्नी स्नेहल कॅन्सरसारख्या महा भयंकर रोगाशी सामना करते आहे. दरम्यान आठवड्याभरापूर्वी तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर हॉस्पीटलमधला स्वतःचा एक फोटो पोस्ट करत तिला आलेला वेदनादायक अनुभव सांगिताना लिहिलं, ‘ऑगस्ट महिन्यात छातीत डाव्या बाजूला दुखणं सुरु झालं… हे दुखणं नवीन होतं… आधी कधीही अनुभवलं नव्हतं… पाठपुरावा करायचं ठरवलं आणि किचकट आजार surprise म्हणून समोर ठाकला… ”स्टेज झिरो कॅन्सर” (Ductal carcinoma in situ)…कॅन्सर च्या आधीची स्टेज… २ मॅमोग्राम, बायोप्सी, सोनोलोकोलायझेशन, ३ नोव्हेंबरला ब्रेस्ट कन्झर्वेशन (conservation) सर्जरी आणि रेडिएशन अशा टप्प्यांतून उपचार सुरु आहेत… ह्या आजाराने मला पूर्ण पकडण्याआधीच मी त्याला एक टप्पा आऊट करू शकले याचं समाधान आहे…’.

‘मनाला आणि शरीराला गेल्या महिन्याभरात खूप सहन करावं लागलंय… अजूनही लागतंय… संपूर्ण प्रक्रियेत मेंटल, इमोशनल ब्रेक डाऊनचे अनेक प्रसंग येतात… मला डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा आणि surgery नंतर पहिल्यांदा जखम पाहिली तेव्हा डोळ्यांना थांबवता नाही आलं… पण जखमांकडे, स्वतःच्या शरीराविषयी जागरूक असल्याची, या प्रसंगाला छान सामोरं गेल्याची खूण म्हणून पाहिलं की गोष्टी सोप्या होतात… त्या अजून सोप्या होतात जेव्हा तुमचं कुटुंब तुमच्यासोबत खंबीरपणे उभं राहतं…

या बाबतीत माहेर आणि सासर दोन्ही कुटुंबांना १०० गुण… कोणताच ड्रामा नाही, साध्या सोप्या पद्धतीने आहे ते accept केलं आणि वातावरण पूर्णपणे नॅार्मल ठेवलं…. मीच का? माझ्यासोबतच का? असे प्रश्न कटाक्षाने टाळायला हवेत… सहानुभूतीचा मोह आवरायलाच हवा… तरच विचारांत धैर्य, भावनांत स्थैर्य येऊ शकतं… ”दिसतं तेच वास्तव” या पलीकडे जाऊन आयुष्याचा विचार सुरु झालाय…’.

‘या सगळ्या काळात जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे या आजाराविषयी जीवघेणा आजार म्हणून जितकं अवडंबर माजवलं जातंय तेवढी जनजागृती नाही… अजूनही या विषयी सांगणं/ बोलणं आपण टाळतो… मुली/ महिला मॅमोग्राम करणं टाळतात, हे करणं का गरजेचं आहे त्या विषयीचा awareness कमी पडतोय… हा आजार अनुवंशिक ही असू शकतो हे मला या process मध्येच कळलं… पण त्या पलीकडेही हे बदलत्या जीवनपद्धतीचं, अवाजवी stress चं प्रतिबिंब आहे… हे विसरता काम नये… तणावापासून स्वतःला दूर ठेवणं ही तुम्ही स्वतःसाठी, आयुष्याप्रति दाखवलेली basic कृतज्ञता असेल… मीही अजून हे शिकतेचं आहे…

दसरा ते दिवाळी या १५ दिवसांत शरीरातून ही कॅन्सरची नकारात्मकता काढून टाकलेय… यंदा दिवाळीत योगायोगाने खूप दिवे गिफ्ट मिळाले… मी ते ”तिमिरातून तेजाकडे” याचं प्रतिक मानलेत… Radiation starts today…’. अद्यापही स्नेहलवर उपचार सुरु आहेत आणि ती औषधोपचारांना चांगला प्रतिसाद देते आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर तिच्या खंबीरपणाचे कौतुक करत तिने लवकर बरे व्हावे.. अशी प्रार्थना केली आहे.