‘आधी तिप्पट टोल वसुली आणि आता…’; मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेमूळे अभिनेत्रीचा प्रवास झाला खराब


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. हे कलाकार या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. इतकेच नव्हे तर ते आपल्या खाजगी आणि प्रोफेशनल दोन्ही आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी यावरून करताना दिसतात. तसेच फोटो, व्हिडीओ, किस्से, अनुभव ते आवर्जून सोशल मीडियावर शेअर करतात. कलाकार मंडळी आणि फिल्म सिटी तसेच मुंबई- पुणे महामार्ग यांचे एक वेगळेच नाते आहे. दररोज अनेक कलाकार कामानिमित्त या महामार्गावर प्रवास करतात. या प्रवासादरम्यान अभिनेत्री ऋजुता देशमुखला एक असा अनुभव आला जो तिने न राहवून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री ऋजुता देशमुख दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी तिच्या संपूर्ण कुटुंबासह पुण्याला जात होती. यावेळी साहजिकच तिला रस्त्यात खालापूर आणि तळेगाव असे दोन टोलनाके लागले. खालापूरचा टोल भरल्यानंतर ऋजुता लोणावळ्यामध्ये टी ब्रेक म्हणून विसावली. पण ब्रेक घेऊन तिने पुढचा प्रवास केला म्हणून तिला तळेगावला ८० ऐवजी २४० रुपये टोल आकारण्यात आल्याचे टोल व्यवस्थापकांनी सांगितले. त्यामुळे हा कुठला नियम..? हे नियम केव्हा बदलले? प्रत्येकाला वेगवेगळे नियम का? असा संतप्त सवाल तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून केला होता.

या घटनेनंतर नाटकाच्या दौऱ्यानिमित्त अभिनेत्री ऋजुता देशमुखने पुन्हा एकदा आपल्या सह कलाकारांसोबत मुंबई- पुणे महामार्गावरून प्रवास केला. याहीवेळी तिला काही वेगळाच अनुभव आल्याने तिने सांगितले आहे. याविषयी तिने सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली आहे. ऋजुता आणि तिचे सहकलाकार मंडळी ज्या बसमधून जात होते त्या बसचं तयार पंक्चर झाल्यामुळे ते बराचवेळ रखडले. त्यामुळे मुंबई- पुणे महामार्ग आणि आपले एक वेगळेच नाते तयार झाल्याचे ऋजुताने म्हटले आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर हि पोस्ट शेअर करत तिने लिहलंय, ‘माझं आणि या महामार्गाचं एक घनिष्ट नात होत चाललंय… आज आमच्या नाटकाची बस पंक्चर झाली’. एकंदरच काय तर महामार्गावरून प्रवास करताना ऋजुताला पुन्हा एकदा त्रास झाल्याचे तिला सांगायचे आहे.