‘मी खरंच नि:शब्द झाले..’; बॉलिवूडच्या ड्रिमगर्लला भेटल्यानंतर रुपालीने व्यक्त केला आनंद


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत संजना हे पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर फार सक्रिय असते. वेगवेगळे लूक, प्रोजेक्ट्सची माहिती आणि आपल्या खासगी आयुष्यातील अनेक अनुभव, प्रसंग ती या माध्यमातून शेअर करत असते. सध्या रुपालीने शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. यामध्ये रुपालीने बॉलिवूडची ड्रिमगर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी भेट झाल्याचे सांगितले आहे.

अभिनेत्री रुपाली भोसले एका कार्यक्रमादरम्यान बॉलीवूडच्या ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांना भेटली. या भेटीचा अनुभव तिने एका पोस्टद्वारे शेअर केला आहे. हि पोस्ट रुपालीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रुपालीने हेमा मालिनी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘ड्रीमगर्ल… त्यांचं सौंदर्य व सुंदर स्वभाव पाहून मी खरंच नि:शब्द झाले. त्यांना रंगभूमीवर लाइव्ह सादरीकरण करताना पाहणं…यापेक्षा दुसरा आनंद तो कोणता..? खूपचं भारी वाटलं’.

पुढे लिहिलंय, ‘ज्यावेळी त्यांची आणि माझी भेट झाली. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ”तू खूप सुंदर आहेस आणि तेवढंच सुंदर तू नृत्य केलंस”. प्रत्यक्ष त्यांच्याकडून माझं कौतुक ऐकलं हेच माझं सर्वात मोठं भाग्य आहे. तुम्ही माझं कौतुक केलंत, मला वेळ दिलात याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे हेमा मॅम!!! तुम्हाला खूप प्रेम’. रुपालीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना तिचे कौतुक केले आहे. शिवाय अनेकांनी रूपालीला ‘भाग्यवान’, ‘नशीबवान’ म्हटले आहे. रुपाली भोसलेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, सध्या ती ‘आई कुठे काय करते’ मालिकेत झळकते आहे. केवळ मराठी नव्हे तर तिने हिंदीतही काम केले आहे.