हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पहिली जाणारी मालिका आहे. या मालिकेचा प्रेक्षक वर्ग प्रचंड मोठा आणि टीआरपी कायम वरच्या टप्प्यावर असतो. अशा या मालिकेने नुकताच तब्बल १ हजार भागांचा टप्पा ओलांडला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि या मालिकेने अगदी तेव्हापासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेतून अभिनेत्री रुपाली भोसलेने साकारलेली ‘संजना’देखील प्रेक्षकांची लाडकी भूमिका आहे. यानिमित्त रुपालीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
रुपालीने सेटवरच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करत लिहिलंय, ”’आई कुठे काय करते’’ या मालिकेचे १ हजार भाग पूर्ण झाले आहेत. एखाद्या प्रोजेक्टला एवढं प्रेम मिळणं ही कलाकारांसाठी खूप मोठी गोष्ट असते. राजन शाही या आमच्या निर्मात्यांकडून टीम वर्क म्हणजे काय असतं हे मला कळालं. ‘’प्रोडक्शन हाऊस’’ यातील ‘’हाऊस’’ शब्दाचा खरा अर्थ आमच्या मालिकेच्या प्रोडक्शनला कळाला आहे. या मालिकेचा मी एक भाग आहे याचा खरंच खूप जास्त अभिमान वाटतोय. नमिता वर्तक या माझ्या मैत्रिणीचे मला संजना दिल्याबद्दल खूप खूप आभार… तुला दिलेला शब्द मला आजही लक्षात आहे. मी संजना कायम त्याच प्रेमाने आणि प्रामाणिकपणे लोकांसमोर सादर करेन. तू माझ्यावर ठेवलेला विश्वास हाच माझा खूप मोठा आधार आहे. आज १ हजार भाग पूर्ण होऊनही आमची टीम पहिल्या दिवसासारखी काम करत आहे. म्हणूनच लोकांना ही मालिका आपलीशी वाटते’.
पुढे लिहलंय, ‘रवी करमरकर यांचा नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो. ही गोष्ट खरंच कमाल आहे. सुबोध भरे तुझ्याबद्दल मी काय बोलू..? आज संजना तुझ्यामुळे लोकप्रिय आहे. पण संजनाला मोठं करण्यात तुझा खूप मोठा हातभार आहे… याच सगळं श्रेय तुला आहे. तुषार विचारेमुळे आज लोकांना मालिका ऐकावीशी वाटते. प्रत्येक वाक्य, भावना यावर तू काम करतो. बऱ्याचदा संपूर्ण डोलारा सांभाळून तू कुठे काही कमी पडणार नाही ना..? याची काळजी घेतोस. या सगळ्यांसह संपूर्ण टीम, सह कलाकारांचे खूप खूप आभार… १ हजार भाग पूर्ण झाले. आता पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम!’.