‘तुमच्यामुळे.. शूटिंगचा सेट घर बनतो’; पडद्यामागील कलाकारांसाठी रुपाली भोसलेची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहनावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रुपाली भोसले कायम चर्चेत असते. या मालिकेत ती ‘संजना’ हे पात्र साकारते आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. रुपाली सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ज्यामुळे ती कायम काही ना काही पोस्ट शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. आताही तिने ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो व्हायरल होतो आहे.

अभिनेत्री रूपाली भोसले सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ज्यावर ती स्वतःचे वेगवेगळे लूक, रिल्स व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. आता नुकताच तिने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या सेटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका सीनसाठी कलाकार आणि मालिकेची टीम किती मेहनत घेते हे दाखवण्यात आलंय. हा व्हिडीओ शेअर करताना रुपालीने लिहिलंय, ‘हा आहे आमचा सेट आणि प्रत्येक वेळी आर्ट डिपार्टमेंट कमालीचा सेट उभा करते आणि तेही खूप कमी वेळात’.

पुढे लिहिलंय, ‘मी गेल्या चार वर्षांपासून आमच्या सेटवर हे बघते. काल ही तयारी बघत असताना मनात असा विचार आला की, नाटकाच्या नेपथ्यासाठी बक्षीस दिले जाते. सिनेमातसुद्धा बक्षीस दिले जाते. तसेच मालिकेसाठीसुद्धा बक्षीस आवश्यक आहे. कारण – खरंच ही मंडळीसुद्धा खूप मेहनत आणि कमाल काम करतात आणि तेही रोज. मालिका विश्वातल्या आर्ट डिपार्टमेंटच्या संपूर्ण टीमचे कौतुक. तुम्हा सर्वांमुळे प्रत्येक फ्रेम सुंदर दिसते. शूटिंगचा सेट घर बनतो’. रुपालीची हि पोस्ट व्हायरल झाली असून यावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी पडद्यामागील कलाकारांचे कौतुक केले आहे.