हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस’ हा प्रेक्षकांचा अत्यंत फेव्हरेट म्हणावा असा रिऍलिटी शो आहे. मग तो मराठी सीजन असो हिंदी असो किंवा अन्य कोणत्या भाषेतील सीजन असो… ज्या त्या सिजनचा मोठा प्रेक्षक वर्ग हा असतोच. सध्या ‘बिग बॉस’ हिंदीचा १७ वा सीजन सुरु आहे. यामध्ये ‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लोखंडे आणि तिचा विकी जैन स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.
यासह मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, नील भट्ट, इशा मालवीय असे अनेक लोकप्रिय कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. मात्र या घरात अंकिताला इतर सदस्यांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाते यावरुन घरातील स्पर्धक नव्हे तर नेटकऱ्यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिनेत्री रुपाली भोसलेने आपलं मतं मांडलं आहे.
रुपाली भोसलेने ‘बिग बॉस १७’ संदर्भात इंस्टाग्राम स्टोरीवर आपले मत शेअर केले आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, ‘वीकेंडच्या वारला मनाराला मोठ्यांचा आदर कर असं नेहमी सांगितलं जातं. पण, इशाचं काय..? तिला कधीच काहीच बोललं जात नाही. नील, रिंकू मॅम, ऐश्वर्या या इंटस्ट्रीमधील मोठ्या लोकांशी ती १९ वर्षांची मुलगी नेहमीच उद्धट बोलते. बिग बॉस तुम्ही आधीसारखे नाही राहिलात आता पूर्णपणे तुमच्यात बदल झालाय. अंकिता पहिल्या दिवसापासून मी एकटी आहे, स्वतंत्र खेळते असं सांगत फिरत असते. पण, प्रत्यक्षात असं ती एकदाही वागत नाही. करण जोहरने तिला अगदी योग्य सल्ला दिला होता. नॉमिनेट झाल्यावर ती सुशांत सिंह राजपूतचं नाव का घेते..? प्रत्येकवेळेला तिला सुशांतच्या चाहत्यांकडून सहानुभूतीची अपेक्षा असते’.
‘जर तू खरंच हुशार आहेस आणि नेहमी स्वतंत्र खेळू शकतेस, तर त्याच्या नावाचा आधार का घेतेस..? तुला जुन्या गोष्टी व भूतकाळ घरात आठवण्याची काहीच गरज नाहीये. ”बिग बॉस” आम्ही टास्क खेळून एक – एक पॉवर मिळवायचो किंवा टास्क केल्यावरच आम्हाला घरात वापरण्यासाठी सामान मिळायचं. पण, या घरात सगळ्या सदस्यांना सेव्हन स्टार हॉटेलसारखी वागणूक देण्यात येत आहे. हेअर ट्रिटमेंट करण्यासाठी बाहेरची लोक येत आहेत. मस्तच!’ अशी पोस्ट शेअर करत रुपालीने तीच मत आणि नाराजी दोन्ही व्यक्त केली आहे. रुपालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, सध्या ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ हे पात्र साकारते आहे.