हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनघा अतुल सध्या प्रचंड चर्चेत आहे. अनघा हि भगरे गुरुजींची कन्या आहे. अभिनय क्षेत्रानंतर आता अनघाने हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. नुकतंच तिने पुण्यात नवं हॉटेल सुरु केलं आहे. नुकतेच १९ ऑक्टोबर २०२३ रोजी अनघा आणि तिचा भाऊ अखिलेश भगरे यांनी मिळून पुण्यातील डेक्कन परिसरात ‘वदनी कवळ’ नावाच्या शुद्ध शाकाहारी हॉटेलचा शुभारंभ केला आहे.
अभिनेत्री अनघा आणि तिचा भाऊ अखिलेश यांचे हॉटेल हे स्वप्न होते. १९ ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या पवित्र दिवसात त्यांच्या या नव्या हॉटेलचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनघाच्या मित्र परिवाराने हजेरी लावली होती. यामध्ये अनघाची खास मैत्रीण आणि मराठी सिनेविश्वातील लाडकी अभिनेत्री ऋतुजा बागवेचा समावेश आहे. ऋतुजाने तिच्या लाडक्या मैत्रिणीच्या नव्या वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देताना ‘वदनी कवळ’ हॉटेलला भेट दिली. ऋतुजाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर या हॉटेलची एक खास झलक शेअर केली आहे.
ऋतुजा बागवेने शेअर केलेल्या या खास व्हिडिओमध्ये तिने अनघाच्या नव्या हॉटेलची अतिशय सुंदर अशी झलक शेअर केली आहे. आपल्या हॉटेलमध्ये पाहुणी म्हणून आलेल्या ऋतुजाला अनघाने स्वत:च्या हाताने जेवण वाढलं. अनघा- अखिलेशच्या ‘वदनी कवळ’ या हॉटेलमध्ये येणाऱ्या खवय्यांना शुद्ध शाकाहारी आणि पारंपरिक थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. ऋतुजाने या थाळीचा एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर आवर्जून शेअर केला आहे. यामध्ये अनघा तिला सीताफळ रबडी वाढताना दिसत आहे. ऋतुजाने मैत्रिणीला शुभेच्छा देताना लिहिले कि, ‘मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो… पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा!! खूप प्रेम…लव्ह यू खूप अन्नदाता सुखी भव:’. अनघाच्या नव्या सुरुवातीसाठी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.