‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेत्याची ‘धर्मवीर 2’मध्ये वर्णी; साकारणार महत्वाची भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली ‘मन उडू उडू झालं’ मालिका संपली असली तरी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेत अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांची प्रमुख भूमिका होती. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. सध्या या मालिकेतील बरीच कलाकार मंडळी नव्या मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. अशातच आता या मालिकेतील एक अभिनेता ‘धर्मवीर २’ चित्रपटात झळकणार असल्याची माहिती त्याने स्वतःचं सोशल मीडियावर दिली आहे.

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या भव्य यशानंतर ‘धर्मवीर २’ची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडींवर भाष्य करणार आहे. २०२३ वर्षाच्या अखेरीस ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत सेटवरील बरेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसले आहेत. अशातच या चित्रपटात ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अभिनेता ऋतुराज फडके देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे.

अभिनेता ऋतुराज फडके याने नुकतेच त्याच्या अधिकृत सोशल मिडिया हॅण्डल इंस्टाग्राम वर आगामी चित्रपट ‘धर्मवीर २’च्या सेटवरील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील पहिल्या फोटोमध्ये ऋतुराज फडके हा चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्याबरोबर दिसतो आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोमध्ये तो साकारत असलेल्या भूमिकेत दिसतो आहे. अद्याप ऋतुराज कोणत्या भूमिकेत झळकणार आहे..? याबाबत त्याने खुलासा केलेला नाही. मात्र या चित्रपटात त्याच्या पदरी महत्वाची भूमिका पडल्याचा अंदाज या फोटोंवरून लावला जात आहे. ऋतुराजने हे फोटो शेअर केल्यानंतर त्याचे चाहते या नव्या भूमिकेसाठी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.