हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग लागल्याची, माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव अमरापूरकर यांचे अहमदनगरमधील सुमन अपार्टमेंट येथे एकूण ४ फ्लॅट आहेत. त्यापैकी एका फ्लॅटमध्ये बुधवारी १३ डिसेंबर २०२३ रोजी ही दुर्घटना घडली. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे.
या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. नामवंत वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सदाशिव अमरापूरकर यांचे सुमन अपार्टमेंटमध्ये ४ फ्लॅट आहेत. ज्यातील एकामध्ये आग लागली होती. हा फ्लॅट सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांच्या नावावर आहे. त्यांनी हा फ्लॅट ज्योती भोर यांना भाड्याने दिला आहे. आग लागली त्यावेळी ज्योती घरातच होत्या. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना घरातून सुखरूप बाहेर काढलं आणि मोठी दुर्घटना टळली.
या घटनेत भाडेकरू ज्योती भोर यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागलेल्या घरातून त्यांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते. दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर हे मूळ अहमदनगरचे होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. मात्र त्यांनी साकारलेले खलनायक विशेष गाजले. फुफ्फुसा संबंधित आजारामुळे त्य्नाचे २०१४ साली वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले होते.