हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. बोल्ड अंदाज आणि कमालीचा अभिनय हि तिच्या चर्चेत असण्याची मुख्य कारणे आहेत. मात्र आज ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. त्याच झालं असं कि, अभिनेत्रीच्या ड्रायव्हरला मुंबईतील मालवणी भागात एका किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. मालवणी भागात गाडी चालवत असताना सईच्या ड्रायव्हरने दोनवेळा हॉर्न वाजवला आणि म्हणून येथील मुलांनी त्याला मारहाण केल्याची माहिती मिळत आहे.
दिनांक १३ ऑगस्ट २०२३ च्या रात्री सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला मारहाण झाल्याचे उघड झाले आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरला त्याने चिंचोली बंदर या ठिकाणी सोडलं आणि तिला सोडून परतत असताना ही घटना घडली असे सांगण्यात आले आहे. सईच्या ड्रायव्हरचे नाव सद्दाम मंडल असे आहे. गेल्या सहा वर्षांपासून तो सई ताम्हणकरकडे कार चालक म्हणून काम करतोय. सईला सोडून घरी परतत असताना मुंबईतल्या मालवणी भागात काही मुलं झिगझॅग पद्धतीने बाईक चालवत होती. यावेळी सद्दामने गाडी पुढे नेण्यासाठी दोनदा हॉर्न वाजवला. त्याचा राग मनात धरुन या चार मुलांनी बांबू आणि पट्ट्याने त्याला बेदम मारहाण केली.
दरम्यान या प्रकरणी एका माध्यमाशी बोलताना सद्दामने सांगितले, ‘मी गाडी चालवत होतो. त्यावेळी काही जण झिगझॅग पद्धतीने बाईक चालवत होते. त्यांचा अपघात होऊ शकत होता इतक्या वेगात ते होते. मी हॉर्न वाजवला आणि गाडी नीट चालवा असं सुचवलं. त्यानंतर या मुलांनी त्यांच्या बाईक थांबवल्या आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या मित्रांनाही बोलवून घेतलं आणि मला मारहाण केली. त्यानंतर ते पळून गेले. मालवणीतल्या काही स्थानिकांनी मला शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर मी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली’. या प्रकरणी, अज्ञातांविरोधात FIR दाखल करण्यात आली असून हे चौघेही अल्पवयीन असण्याची शक्यता असल्याचे, मालवणी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.