‘ताली’मध्ये सुव्रतने साकारली तृतीयपंथीची भूमिका; पतीचे कौतुक करत सखी म्हणाली, ‘तू कायम स्वतःला.. ‘


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच १५ ऑगस्ट २०२३ रोजी रवी जाधव दिग्दर्शित आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन अभिनित ‘ताली’ ही बहुभाषिक वेब सिरीज रिलीज झाली आहे. यामध्ये तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्री गौरी सावंत यांच्या जीवनातील संघर्षकथा पहायला मिळते आहे. श्री गौरी यांच्या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेत्री सुश्मिता सेनने अत्यंत लक्षवेधी काम केले आहे. तसेच या सिरीजमध्ये मराठी अभिनेता सुव्रत जोशीनेदेखील तृतीयपंथीची भूमिका साकारली आहे. यासाठी त्याची पत्नी अभिनेत्री सखी गोखलेने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता सुव्रत जोशीची पत्नी आणि अभिनेत्री सखी गोखलेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने ‘ताली’ सिरीजमधील एका सीनचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ज्यात सुव्रत तृतीयपंथी भूमिकेत दिसतोय. यासोबत तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. ‘सू मला तुझा खूप अभिमान वाटतो. काय सुंदर परफॉर्मन्स दिला आहेस तू. तुझ्याबरोबर राहूनसुद्धा तू या भूमिकेसाठी तयारी कधी केलीस हे माझ्यासाठी कोड आहे. तुझ्या अभिनयातून तू दाखवलेली संवेदनशीलता आणि आजवर दुर्लक्षित राहिलेल्या वारंवार अपमानित झालेलं जेंडर साकारण्यासाठी लागणारा समतोल साकारण्यासाठी तू खूप प्रयत्न केलेस हे दिसून येतयं’.

पुढे लिहिलंय, ‘तू कायम स्वत:ला अशी आव्हान देत राहा आणि तुझ्या भवतीची बंधन तोडत रहा. आय लव्ह यू. तू मला आज प्रेरणा दिलीस स्वत:च्या कलेत अजून नैपुण्य मिळवण्यासाठी आणि स्वत:च्या कलेशी एकनिष्ठ राहण्याची’. यासोबतच सखीने ‘ताली’ सीरिजच्या संपूर्ण टीमचे, अभिनेत्री सुश्मिता सेन आणि त्याचसोबत लेखक क्षितिज पटवर्धन, दिग्दर्शक रवी जाधव यांचेही कौतुक केले आहे.

सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांची भेट झी मराठीच्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या सेटवर झाली. आधी मैत्री आणि त्यानंतर प्रेमात पडलेल्या सखी – सुव्रतने ११ एप्रिल २०१९ रोजी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर दोघेही सक्रिय असतात आणि असेच नेहमी एकमेकांच्या कामाचे कौतुक करत प्रोत्साहन देताना दिसतात.