‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अवनी झळकणार नव्या मालिकेत; प्रोमो रिलीज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवरील प्रेक्षकांची लाडकी ठरलेली मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ ऑफ एअर गेली. या मालिकेतून कौटुंबिक कथानकाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मालिका संपली मात्र हे कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री साक्षी गांधी. या मालिकेत तिने अवनी हे पात्र साकारले होते. जे चांगलेच गाजले. यानंतर आता एका नव्या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाली आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील बरेच कलाकार नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यांमध्ये आता अभिनेत्री साक्षी गांधीचादेखील समावेश झाला आहे. लवकरच ती एका नव्या मालिकेतून नव्या भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेचे नाव ‘नवी जन्मेन मी’ असे आहे. हि मालिका सन मराठी या वाहिनीवर सुरु होते आहे. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. मालिकेचा प्रोमो पाहून याचे कथानक गावाकडच्या मातीतले असल्याचे समजत आहे.

‘सन मराठी’ वाहिनीवर येत्या काही दिवसात ‘नवी जन्मेन मी…’ ही मालिका सुरु होते आहे. या मालिकेत अभिनेत्री साक्षी गांधी अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये साक्षी दिसत नसली तरी मालिकेत तिची भूमिका हुकमी एक्का ठरणार आहे. या मालिकेत अभिनेत्री शिल्पा ठाकरे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इतकेच नव्हे तर ‘राजा रानीचं गं जोडी’ फेम मनिराज पवार या मालिकेतून बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अद्याप हि मालिका कधी सुरु होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.