‘.. तेव्हा खऱ्या अर्थाने घराची ओढ वाटते’; आई- वडिलांच्या आठवणीत अभिनेत्री झाली भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार आज यशाच्या उंच शिखरावर आहेत. पण हे यश मिळवताना त्यांनी केलेले त्याग आणि मेहनत हि फार कमीवेळा समोर येते. अनेक कलाकार आपल्या आई वडिलांची छत्रछाया सोडून इंडस्ट्रीत नावलौकिक मिळवण्यासाठी घरापासून लांब राहत असतात. यांपैकी एक म्हणजे मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी गांधी. स्टार प्रवाहच्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेली साक्षी आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे मात्र आई वडिलांपासून लांब असण्याची जाणीव तिला अनेकदा भावूक करत असते.

दरम्यान, अभिनेत्री साक्षी गांधीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई-वडिलांच्या आठणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. साक्षीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ही भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे कि, ‘मुलं मोठी झाली की करिअर करण्यासाठी बाहेर पडतात… आपल्या कुटुंबापासून दूर राहतात… महिनों- महिने एकमेकांची भेट होत नाही किंवा एकमेकांना पाहताही येत नाही… कॉलवर फक्त आवाज ऐकावा लागतो. चिपळूण सोडून घरच्यांपासून दूर मुंबईत आले त्याला आता सात वर्षे झाली’.

‘खूप मोठं व्हायचं असतं, पैसे कमवायचे असतात, सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. का? तर आयुष्यात स्थिरस्थावर व्हायचं असतं म्हणून. पण, आपण आयुष्यात खरंच कधी स्थिरस्थावर होतो का? आपण कामासाठी इतके धावत असतो की, अनेक दिवस घरी दोन मिनिटांचा कॉलसुद्धा करता येत नाही. आई – वडिलांच्या जीवाची घालमेल होत नसेल का? त्यांना रात्र रात्र झोप लागत असेल का? त्यांच्या घशाखाली एखादा चमचमीत पदार्थ उतरत असेल का? हा विचार करून त्रास होतो. पण, सहज उठून जाताही येत नाही आणि तेव्हा खऱ्या अर्थाने घराची ओढ वाटते. आई, पप्पा, क्षितू तुम्हाला खूप दिवस झाले पाहिलं नाही आहे, पण आपण लवकरच भेटू’.