‘तुम्ही भेटलात कि लहानपण भेटतं..’; अशोक मामांना भेटल्यानंतर सलील कुलकर्णींची पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील तरुण कलाकार ज्यांना पाहून मोठे झाले, ज्यांच्याकडून शिकले असे महानायक अशोक सराफ सर्वांचेच लाडके आहेत. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे प्रत्येक वयोगटात त्यांचे चाहते आहेत. फक्त कलाकार मंडळी नव्हे तर प्रेक्षकही त्यांना प्रेमाने मामा अशी हाक मारतात. अशोक मामांची भेट होणे, हा क्षण प्रत्येकासाठी अनमोल आणि डोळ्यात साठवून ठेवण्याजोगा आहे. या भेटीचा योग झी मराठीवर सुरु असलेल्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ना आला. यावेळी छोट्या गायकांनी मामांचे आदरातिथ्य केले. हे प्रेम पाहून मामा भावनिक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. दरम्यान शोचे परीक्षक सलील कुलकर्णी यांनी अशोक मामांना भेटून झालेला आनंद एक पोस्ट शेअर करत व्यक्त केलाय.

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, ‘अशोक सराफ सर .. !! हे नाव पहिल्यांदा कधी ऐकलं असं आठवायला लागलो.. मी शाळेत असतांना माझ्या आईने आम्हाला सायकलवरून विजय टॉकीजला “गोंधळात गोंधळ“ पाहायला नेलं होतं तो दिवस आठवला.. दोन चार महिन्यातून एखादा चित्रपट पहायला मिळायचा तेव्हा आधीच्या जाहिराती सुद्धा डोळे भरून बघितल्या जायच्या, याची गंमत आता एकाच वेळी नेटफ्लिक्सवर पिक्चर, हॉटस्टारवर मॅच आणि प्राईमवर “फ्रेंड्स “ बघणाऱ्यांना कळणार नाही. “ एक डाव भुताचा” मधले अशोक सराफ तर इतके आवडले की नंतर बरेच दिवस मी बुरुं असा आवाज काढून “मास्तुरे..“ असं म्हणत होतो. त्या चित्रपटानंतर डेक्कनवर खाल्लेला साधा डोसा आठवतो. साधा डोसा आणि अर्ध अर्ध गोल्ड स्पॉट मी आणि माझी बहीण. आईने नेहमीप्रमाणे त्याग करून फक्त इडली..’

‘लक्ष्या बेर्डे- अशोक सराफ यांनी धुमाकूळ घातलेला तो काळ.. धुमधडाका मधले वाख्या वुक्खहूवाले अशोक सराफ आणि मग बनवाबनवी मध्ये हा माझी बायकोपासून ते धनंजय माने इथेच राहतात का.. आणि लिंबू कलरच्या साडीपासून ते कुणीतरी येणार येणार ग पर्यंत सगळं तोंडपाठ झालं.. अशोकमामांच्या मला सर्वात आवडणाऱ्या भूमिकांमधल्या दोन भूमिका म्हणजे.. “कळत नकळत”मधला “मामा” आणि “चौकट राजा” मधला ‘’गणा’’.. हिंदी चित्रपटात सर्व नायकांपेक्षा सहज भूमिका करतांना जाणवतात ते आपले अशोकमामा.. अभिनयाचा ‘सम्राट’ अशोक. या महानायकाच्या बरोबर माझं नाव पडद्यावर बघतांना झालेला आनंद मला आजही लक्षात आहे .. “एक उनाड दिवस” मध्ये .. “हुरहूर असते तीच उरी” ऐकणारे अशोक सराफ आणि” निशाणी डावा अंगठा” मधले मुख्याध्यापक… अशा त्यांच्यासाठी काही चित्रपटात मला गाणी करता आली हे किती मोठं भाग्य ..’

अलीकडच्या काळात.. श्रावणमाशी ..किंवा आनंदाने वेडेपिशे होणे म्हणत आपल्याला वेड लावणारे “ एक डाव धोबीपछाड “ मधले अशोकमामा अजूनही पांडू हवालदार मधलीच एनर्जी घेऊन वावरतात.. ते भेटतात तेव्हा शांत , प्रांजळ , मिश्किल पण मोजकं बोलणारे असतात. झी ने जीवनगौरव साजरा करतांना सिद्धार्थ जाधवने इतका अप्रतिम परफॉर्मन्स केला कि अशोक मामांना गदगदलेलं पाहिलं. या आठवड्यात आमच्या सारेगमप मध्ये ते स्वतः आले आहेत. शूटिंग दरम्यान मला भेटून “ एकदा काय झालं “ साठी अभिनंदन केलं तेव्हा पाया पडलो आणि त्यांना सांगितलं- तुम्ही भेटलात कि लहानपण भेटतं.. शाळा .. कॉलेज ..साधा डोसा.. आईची सायकल.. सगळं पुन्हा भेटतं ..!! मराठी चित्रपटाच्या इतिहासातला अत्यंत मोठा चॅप्टर आपल्याला प्रत्यक्ष भेटतो .. ही गणपती बाप्पाची कृपा!!’