‘आयुष्यभर कलेला सावलीप्रमाणे…’; अण्णांच्या निधनानंतर समीर चौघुलेने शेअर केली भावनिक पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोमवार दिनांक ४ जुलै २०२३ हा दिवस मराठी कलाविश्वासाठी काळा दिवस ठरला. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आणि सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. मराठी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, मालिका विश्वातही जयंत सावरकरांनी आपले स्थान निर्माण केले होते. वयाच्या या टप्प्यातही ते कला विश्वाला समर्पित होऊन कार्यरत होते. त्यांच्या निधनाचा संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का लागला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर जयंत सावरकर म्हणजेच अण्णांच्या आठवणीत भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले यांनीदेखील अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी जयंत सावरकरांचा एक फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘दिग्गज रंगकर्मी नटश्रेष्ठ अण्णा सावरकर गेले…तरुणांना ही लाजवेल अशी एनर्जी असणारा सच्चा रंगकर्मी गेला….नागपूरच्या नाट्य संमेलनात आम्ही दोघे रूम पार्टनर होतो…. ”समीर तू बिनधास्त रात्री उशिरा पर्यंत टिव्ही बघ हं…. मला झोपेचा काहीच प्रॉब्लेम नाही.. मला कुठे ही झोप लागते..” अस म्हणून निमिषार्धात आमच्या वयातील दरी नाहीशी करून कोणत्या ही पिढीशी जुळवून घेणारे अण्णा त्या क्षणी प्रेमात पाडून गेले…’

पुढे लिहिलं, ‘सतत दुसऱ्याचं कौतुक करण्याचा स्वभाव आणि त्यांच्या संगमरवरी कारकिर्दीचे किस्से यात पहाट कधी झाली हेच कळलं नाही… मी सतत सांगतोय.. ”अण्णा तुम्ही झोपा..” पण छे हा तरुण ऐकतोय कसला! ….साधारणतः मैफल काही लोकांची असते.. पण त्या रात्री मात्र रसिक फक्त “मी” होतो हे माझे भाग्य…. असे हे आमचे दोस्त अण्णा….. तुमच्या सारख आयुष्यभर कलेला सावलीप्रमाणे घेऊन जगता आलं पाहिजे हो… अण्णा… आम्ही तुम्हाला खूप मिस करू… जिथे असाल तिथे मस्तच असाल’.