‘वरकरणी अत्यंत कोरडा वाटणारा…’; MHJ फेम ओंकार राऊतच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुलेंची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील मोठा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रकाश झोतात आले. त्यांपैकी एक म्हणजे ओंकार राऊत. आज ओंकार राऊतचा ३३ वा वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्याचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील अत्यंत लोकप्रिय सिने अभिनेते समीर चौघुले यांनी एक खास पोस्ट शेअर करत ओंकारला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच ओंकारसोबतच्या नात्याचाही त्यांनी उलघडा केला आहे.

समीर चौघुलेंनी या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘ओंकार राऊत.. वाढदिवसाच्या फुल्टू शुभेच्छा…गेल्या वर्षी तुझ्या वाढदिवसानिमित्ताने काही कारणास्तव पोस्ट टाकली नाही… तुला कारण माहितीय… पण या वर्षी मी ही संधी गमावणार नाही……. ओंकार, ओंकी, राजदीप, ओम.. साधारणतः दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला रंगकर्मी.. रुपारेल महाविद्यालयात एकांकिका क्षेत्रातील मोठं नाव, नाटकावर मनापासून प्रेम करणारा असल्याने एखाद दोन प्रहसनातच तो हास्यजत्रेत रुळला कारण, आमच्या ओंक्याची ग्रास्पिंग करण्याची क्षमता अफाट आहे….. आणि सगळ्यात महत्वाचं “शिकण्याची आणि इतरांनी केलेल्या सूचना, लक्षात आणून दिलेल्या चुका प्रांजळपणे स्वीकारण्याची वृत्ती आहे… प्रत्येक स्किटनंतर पाटी कोरी करून गोस्वामी सरांसमोर नव्याने धडे गिरवायला बसण्याची वृत्तीच तुला अजून मोठं करणार ओंकार …’

‘ओंकारचं आणि माझं खास नातं आहे… understanding आहे… मला स्वतःला ॲक्शन फिल्म्स खूप आवडतात… हॉलिवूडची प्रत्येक अँक्शन फिल्म आम्ही एकत्र बघतो…. क्रिकेट आमच्या दोघांचाही श्वास आहे… अरिजित सिंहचे “खैरियत पूछो” हे गाणं आम्हा दोघांना ही प्रचंड आवडत…. आमच्या राऊतला “कंटाळा” आणि “आता कशाला?” हे शब्द खूप आवडतात… वर वर अत्यंत बेपर्वा आणि कूल वाटणारा ओंकार.. स्वतःच्या कामाबद्दल अत्यंत सिरियस आहे… एखादे स्किट पडल्यावर स्वतःवरच चिडणारा ओंकार मी जवळून बघितलाय…. वरकरणी अत्यंत कोरडा वाटणारा आमचा मनोमिलन स्वरछेडे आतून खूप हळवा आहे… अशा या मित्रास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!’ या पोस्टवर कमेंट करत ओंकार राऊतने म्हटले, ‘दादा! काय बोलू आणि काय नको असे झाले आहे… खूप खूप धन्यवाद! तुझ्यामुळेच सगळं झालंय लव्ह यू’.