हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा चाहता वर्ग फार मोठा आहे. या कार्यक्रमातून अनेक हरहुन्नरी कलाकार सिनेसृष्टीला मिळाले आहेत. या कार्यक्रमाचा एक अविभाज्य घटक म्हणजे समीर चौगुले. कधी लोचण मजनू, तर कधी शिवालीचा बाबा.. इतकंच काय तर दाराचा आणि बेलचा आवाज अशा वेगवेगळ्या ढंगातून समीर चौघुले प्रेक्षकांना हसवताना दिसतात. केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर एक लेखक म्हणून देखील ते या कार्यक्रमाचा भाग आहेत. तसेच स्वतःसोबत इतरांनाही ते प्रोत्साहन देऊन काम करतात. नुकतीच त्यांनी MHJ फेम अभिनेता प्रभाकर मोरे यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
View this post on Instagram
अभिनेता समीर चौघुले हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे अनेकदा विविध पोस्ट शेअर करत ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सहकलाकारांविषयी बोलताना दिसतात. आजही त्यांनी अशाच एका कलाकारासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. हा कलाकार दुसरं तिसरं कुणी नसून दिग्गज अभिनेते प्रभाकर मोरे आहेत. प्रभाकर मोरे यांना ‘कोकणचे पारसमणी’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या स्किट मधील त्यांचे ‘शालू..’ हे गाणे तर अतिशय प्रसिद्ध आहे. शिवाय त्यांचा कोकणी अंदाज नेहमीच भारावून टाकणारा असतो. अशा ‘कोकणचे पारसमणी’ प्रभाकर मोरे यांचा काल वाढदिवस आणि याच निमित्ताने समीर चौघुले यांनी हि पोस्ट शेअर केली आहे.
समीर यांनी हि पोस्ट शेअर करताना लिहिलंय, ‘हॅप्पी बर्थ डे प्रभाकर मोरे… आमचा हास्य जत्रेचा “कातील मोरे”.. आमच्या मोरेंचा स्वॅगच वेगळा आहे.. याच टायमिंग, पंच टाकण्याआधी घेतलेला स्टान्स सगळंच अफाट आहे. कोकणी मातीतला कलाकार मालवणी बाणकोटी भाषेत मंचावर अक्षरशः धुमाकूळ घालतो. विशेषतः मल्टी मिलिनीयर वगैरे भूमिकेत हा तुफान भाव खाऊन जातो. जगप्रसिद्ध शालू या नृत्य प्रकाराचा हा जनक आहे. स्वभावाने अत्यंत साधा सरळ.. रंगभूमीवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव, साक्षात बाबूजी म्हणजेच मच्छिंद्र कांबळी यांच्याबरोबर वस्त्रहरण या नाटकात काम करण्याचं भाग्य आमच्या प्रभाकरला लाभलंय.. मित्रा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा’. अशा शब्दात समीर यांनी प्रभाकर मोरे यांची कारकीर्द आणि त्यांच्या अभिनयातील बारकावे अगदी कमी शब्दांत स्पष्ट मांडले आहेत.