हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका, सूत्रसंचालन आणि कॉमेडीच्या विश्वात आपल्या स्वबळावर नावलौकिक मिळवलेला अभिनेता संदीप पथक हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्युमुळे त्याचे फॉलोवर्स चांगलेच आहेत. आतापर्यंत संदीपने साकारलेल्या विविध भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाच्या माध्यमातून संदीपने देशचं काय तर विदेशसुद्धा गाजवला आहे. मराठी रंगभूमीने संदीपला एक वेगळीच ओळख दिली आहे आणि यासाठी तो नेहमी कृतज्ञता बाळगताना दिसला आहे.
अलीकडेच संदीप पाठकने एका नामवंत वाहिनीला मुलाखत दिली आणि यामध्ये त्याने मराठी रंगभूमी तसेच रंगभूमीवरील कलाकरांचे भरभरून कौतुक केले आहे. अभिनेता संदीप पाठक म्हणाला कि, ‘टेलिव्हिजन शो करताना आपल्याला सेटवर रोज तीच लोकं पुन्हा भेटतात पण, नाटक करताना आपण दौऱ्यावर असतो रोज वेगवेगळ्या लोकांना भेटतो. नाटक ही जिवंत कला आहे, प्रेक्षकांची दाद सुद्धा समोरासमोर मिळते म्हणून मला नाटक करणं जास्त आवडतं. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ आणि इतर नाटकांमुळे मी आयुष्यात एवढा मोठा झालो. मी असं नेहमी म्हणतो की, आईने मला ‘माणूस’ म्हणून आणि रंगभूमीने मला ‘नट’ म्हणून जन्म दिला. त्यामुळे रंगभूमी माझ्या सर्वात जवळची आहे’.
संदीप पुढे असं म्हणाला कि, ‘जर आज आपण ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ किंवा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ पाहिले तर आपल्याला एक लक्षात येईल की, मराठी रंगभूमी जगात सर्वात अव्वल आहे. नाटकांचे सगळे रेकॉर्ड्स मराठी रंगभूमीच्या नावे आहेत. प्रशांत दामले यामध्ये टॉपला आहेत. यामध्ये आमच्या ‘वऱ्हाड…’ नाटकाचा रेकॉर्ड आहे. ‘सही रे सही’ आता ५ हजार प्रयोगांकडे जातंय म्हणजे त्यांचा वेगळा रेकॉर्ड होईल. ‘ऑल द बेस्ट’, ‘यदा कदाचित’ ही नाटकं सुद्धा आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमी आणि ही नाटकं आपल्यासाठी मानाचं पान आहे’.