हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांत ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिकांनी निरोप घेतला आहे. ज्यामध्ये ‘लोकमान्य’, ‘लवंगी मिरची’ अशा मालिकांचा समावेश आहे. अशातच आता आणखी एका मालिकेने निरोप घेतल्याचे समोर आले आहे. हि मालिका म्हणजे ‘दार उघड बये’. या मालिकेत रोशन विचारे, सानिया चौधरी, शरद पोंक्षे, किशोरी अंबिये अशी तगडी स्टारकास्ट होती. या लोकप्रिय मालिकेचा ७ ऑक्टोबर २०२३ रोजी शेवटचा भाग प्रसारित झाला. यानिमित्ताने मुक्ता हे मुख्य पात्र साकारणाऱ्या सानिया चौधरीने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
‘दार उघड बये’ ही मालिका १९ सप्टेंबरला २०२२ रोजी सुरु झाली होती आणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी एअर ऑफ झाली. या मालिकेतील मुक्ता आणि सारंगची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली. आता ३०० भागांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर या मालिकेने निरोप घेतला आहे. प्रेक्षकांचा निरोप घेताना अभिनेत्री सानिया चौधरी भावुक झाली आणि तिने मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर करत भावनिक पोस्ट शेअर केली. तिने लिहिलं, ‘मुक्ताचा वर्षभराचा अविस्मरणीय प्रवास आज संपला. उद्यापासून मुक्ता तुमच्या भेटीला नसेल… या कथेला जरी पूर्णविराम मिळत असला, तरी ‘मुक्ता ‘ माझ्यामध्ये कायमची सामावली गेली आहे. खंबीर, बेधडक, अन्याय सहन न करणारी, पण तितकीच प्रेमळ ,गोड आणि हळवी…आपली कला आणि नाती सुद्धा जीवापाड जपणारी मुक्ता…जिने कलेवर जिवापाड प्रेम करणं नव्याने शिकवलं….’
‘मुक्ताचे खूप खूप आभार…मला मुक्ता साकारायला मिळाली म्हणून… आणि प्रेक्षकहो तुमचे सुद्धा आभार, कारण तुमच्या प्रेमाने मला शेवटच्या भागापर्यंत त्याच उत्साहाने मुक्ता साकारण्याची ताकद दिली. संपूर्ण मालिकेत माझे सगळ्यात जास्त सीन शूट झाले ते संबळ आणि देवी आईबरोबर… मालिकेची सुरुवात मी संबळ वाजवत झाली आणि शेवट ही संबळ वाजवतच झाला…यांना अंतर कसं देणार? म्हणून सेटवरुन माझ्या जिवाभावाच्या या दोन्ही गोष्टी, संबळ आणि देवी आईचा मुखवटा हक्काने माझ्याबरोबर घरी घेऊन आले…. आता त्या कायम माझ्याजवळ असतील आणि ‘मुक्ता’ कायम माझ्या मनात असेल …’