‘रंगमंचावरचा हा भारावून टाकणारा अनुभव…’; भरत जाधव यांच्या नव्या नाटकाचे प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून कौतुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित ‘अस्तित्व’ ही नाट्यकलाकृती सध्या रंगभूमीवर गाजताना दिसत आहे. या नाटकाचे कथानक अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचे अस्तित्व शोधणाऱ्या कुटुंबावर आधारलेलं आहे. हे एक कौटुंबिक नाटक असून रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. या नाटकात भारत जाधव, चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, श्याम घोरपडे, जयराज नायर हे मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळी या कलाकृतीचे भरभरून कौतुक करताना दिसत आहे. ज्यामध्ये दिग्दर्शक संजय जाधव यांचा समावेश आहे.

या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वप्नील जाधव यांनी केले आहे. हे नाटक पाहिल्यानंतर मराठी सिनेदिग्दर्शक संजय जाधव यांनी सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिलंय, ‘अस्तित्व… एक भारावून टाकणारा भारदस्त अनुभव… भरत जाधव तू एक प्रचंड ताकदीचा अभिनेता आहेस हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही… पण रंगमंचावर Pauses मधे जागा कशा काढाव्या हे तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे… चिन्मयी तुझ्याबरोबर ‘चेकमेट’नंतर काम करता आलं नाही, एकच पुन्हा एकदा वाईट वाटलं यार… तू कमाल करतेस… हार्दिक जाधव आणि सलोनी तुम्ही कधीच नवखे वाटला नाहीत….’

पुढे, ‘खूप कौतुक दिग्दर्शक स्वप्नील जाधवच …. अप्रतिम मांडणी आणि खूप सुंदर काँपोझिशन्स…. वा मज्जाच आली भरत… रंगमंचावरचा हा भारावून टाकणारा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा…’. ‘अस्तित्व’ या नाटकातून हसोळकर कुटुंब आपल्या भेटीला आलं आहे. जे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी झटत, धडपडत आहेत. या कुटुंबाचा एकमेव कर्ता पुरुष संतोष हसोळकर जो लवकरच नोकरीतून निवृत्त होणार आहे त्याची ही गोष्ट. त्याने निवृत्तीनंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतलाय पण त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध आहे आणि म्हणून प्रत्येक जण आपापल्या अस्तित्वाच्या शोधात आहेत’. हि गोष्ट सर्वसामान्य माणसाची आहे आणि म्हणूनच अनेकांच्या हृदयाजवळची. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.