अभिनंदन!! जालन्याच्या संकल्प काळेने पटकावलं ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 2’चे विजेतेपद


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात श्रेया गाढवे, सृष्टी पगारे, संकल्प काळे, श्रुती भांडे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर या सहा छोट्या उतसादांमध्ये लढत रंगली आणि ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’चा विजेता मिळाला. चुरशीची लढत देऊन जालन्याच्या संकल्प काळेने विजेतेपद पटकावले.

या महाअंतिम फेरीत जालन्याचा संकल्प काळे विजेता तर अकोल्याची श्रुती भांडे उपविजेती ठरली. तसेच नाशिकच्या सृष्टी पगारेने तिसरा क्रमांक पटकावला. यावेळी श्रेया गाढवे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर या छोट्या उस्तादांना त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीसाठी गौरविण्यात आले. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ या कार्यक्रमाचे विजेतेपद पटकावल्यानंतर संकल्प काळेला ४ लाख रुपये रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले.

प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर आपल्या विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना छोटा उस्ताद संकल्प काळे म्हणाला कि, ‘मी आजवर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये भाग घेतला मात्र छोटे उस्तादच्या मंचाने मला संधी दिली आणि मला माझं गायन कौशल्य सादर करता आलं. स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीबद्दल मी आभारी आहे. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं’.