‘खूप बटन्स, पायलटची खुर्ची, मॉनिटर…’; संकर्षण कऱ्हाडेने सांगितला विमानाच्या केबिनमधला अनुभव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये अभिनय आणि सूत्रसंचालन, काव्य लेखन यामध्ये पारंगत असलेला संकर्षण कऱ्हाडे हरहुन्नरी कलाकार आहे. आपल्या दमदार शैलीने तो कायम प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान भक्कम करताना दिसतो. अभिनयासह त्यांच्या अंगी असणाऱ्या इतर गुणांमुळे आज मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचं आवर्जुन नाव घेतलं जात. शिवाय तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्यामुळे तो शेअर करत असलेल्या व्हिडीओ, फोटो आणि अनुभवांच्या पोस्ट देखील भन्नाट व्हायरल होत असतात. नुकताच त्याने विमानाच्या केबिनमधला स्वतःचा अनुभव शेअर केला आहे.

या पोस्टमध्ये संकर्षणने लिहिलंय कि, ‘माझा हा अनुभव वेळ असेल तर, नक्की वाचा .. कॅनसास सिटीहून क्लिव्हलँडला जाण्यासाठी विमानांत शिरलो तर फार गर्दी नव्हती.. विमान उडतं कसं.. ? कसं चालवतात.. ? याच्याविषयी मनात कायम प्रश्न पडलेले असतात. म्हणून दरवेळी मी विमानात बसताना कुतूहलाने केबीनकडे बघतोच.. आजही तेच केलं. तर हे “पायलट साहेब” (आपल्याकडच्या ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब सारखं म्हणतोय) जरा मोकळे वाटले…. माझ्याकडे बघून, स्वत:हून हसले. आपल्याला “उडवून नेणारा पायलट” आपल्याला स्वत:हून स्माईल देतोय म्हटल्यावर हेच मोफत स्माईल दुप्पटीने परत करायला कसला भाव खायचा..? म्हणून मी त्यांच्यापेक्षा जास्त मोकळा हसलो आणि त्याच्या केबीनकडे “काय भाऊ; येऊ का घरात..?”च्या नजरेनेच पाहिलं. त्यालाही ते कळलंच. त्याने मग स्वत:हून “Welcome to my working area” (मी काम करत असलेल्या विभागात तुमचं स्वागत आहे), असं म्हणाल्यावर मी फार फार खुष झालो गड्या’.

पुढे लिहलंय, ‘पहिल्यांदाच विमानाच्या केबिनमध्ये पाय ठेवला. जिथुन २००/३००/४०० लोकांना घेऊन ही विमानं उडत असतात. खूप सारे बटन्स, पायलटची खुर्ची, मॉनिटर, टेक ऑफ लँडिंगची ती दांडी हे मज्जा वाटली पाहताना. मला झालेला एकंदरीत आनंद पाहता तो परत स्वतःहून म्हणाला, “सिट देअर अ‍ॅण्ड क्लिक अ पिक्चर”. मी पाहातच राहिलो. मला प्रश्न पडला की, हा माझ्या चेहरऱ्यावरचा अती आनंद पाहून मनात मला वेड्यात काढून माझी गंमत करतोय का..? मग मी जरा कंट्रोल्ड वागायची अ‍ॅक्टींग करत “नो नो.. इट्स ओके…” वगैरे म्हणालो तर “कॅप्टन पिटर रसल भाऊंनी” आग्रहाने पायलट सीटवर बसवलं आणि माझा फोटो घेतला. आर काय आनंद झाला म्हणून सांगू..? मग प्रथेप्रमाणे “Can I click a Picture with you” (मी तुमच्याबरोबर एक फोटो काढू) असं वाक्यं कुणीतरी एकजण म्हणतंच, ते मी म्हणालो आणि पिटर भाऊंबरोबर फोटो काढला.

थोड्या गप्पा झाल्या, नंबर एक्सेंज झाले. अजून जरावेळ एकत्रं घालवला असता, तर तो तरी म्हणाला असता की, “विमान चालवतोस का…? किंवा मी तरी म्हणालो असतो “हो बाजूला मीच चालवतो.” पण त्याच्या आतच संभाषण थांबलं आणि मी माझ्या सीटवर येऊन बसलो आणि पूर्ण प्रवासभर “आता तो हे बटन दाबत असेल. आता तो स्पीकरवर बोलत असेल” असा विचार करत, आनंदात बसून राहिलो. लोकंहो विचार करा. जरा स्माईल दिलं, प्रेमानं बोललं की, मनात असलं ते सगळं होतंय. आज विमानाचं केबिन पाहिल्यामुळे मी मात्र “हवेत आहे”