‘सगळा परिसर कापूरच्या ज्योतीने…’; संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला अंबाबाईच्या मंदिरातील अनुभव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संकर्षण कऱ्हाडे हा अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आज त्याचा स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर उत्तम कवी आणि सूत्रसंचालक म्हणून देखील संकर्षणचे नाव आवर्जून घेतले जाते. शिवाय संकर्षण सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. या माध्यमातून तो अनुभव, किस्से आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत असतो. आताही त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या मंदिरात आलेला अनुभव शेअर केला आहे.

हि पोस्ट शेअर करताना त्याने महालक्ष्मीच्या मंदिराबाहेरील काही फोटो पोस्ट केले आहेत. सोबत लिहिलंय, ‘सुप्रभात, आज पहाटे २.३० पासूनचा अनुभव… कार्तिक मासामध्ये महालक्ष्मी देवीच्या; अंबाबाईच्या नित्योपचारात बदल होतो… पहाटे २.३० वाजता मंदिर उघडते आणि काकड सुरू होतो. मशाल घेऊन देवीच्या कळसापासून कापूर लावण्यास सुरुवात होते ते गाभाऱ्यातल्या जवळपास १५० मंदिरांच्या ठिकाणी कापूर प्रज्वलित केला जातो. पहाटे ३/३.३० वाजता सगळा परिसर कापूरच्या ज्योतीने उजळेला पाहून काय प्रसन्न वाटत होतं. त्यात हे सगळं सनईच्या गोड आवाजात…’.

‘हे करता करता देवीसमोरचं दार म्हणजे मुख्य गर्भगृह उघडलं जातं आणि देवीला “उठ उठ माते अरुणोदय झाला” अशी साद घालत जागं केलं जातं… देवीची काकड आरती केली जाते… काल सांगलीचा रात्रीचा प्रयोग करून मी पहाटे २.३० वाजता मंदिरात आलो. हा सगळा सोहळा मला पहिल्यांदाच पाहता आला… अनुभवता आला… आणि तुम्हाला सांगतो; देवीच्या पायावर डोकं ठेऊन दर्शन घेता आलं… काय सांगावं कसं वाटलं… माझे डोळे सतत भरून येत होते… मनात काय भाव आले हे सांगताच येणार नाही, असा हा अनुभव होता’.