बाबा महाराजांच्या निधनाने हळवा झाला संकर्षण; म्हणाला, ‘आज ते आपल्यातनं गेले पण..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी आज निधन झाले. नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नेरूळ जिमखानासमोरील विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात आले आहे. बाबा महाराज सातारकर यांनी आपले आयुष्य संप्रदाय आणि अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी वाहिले. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं कायम प्रबोधन केले. त्यांच्या निधनाने संपूर्ण संप्रदाय हळहळला आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक पोस्ट शेअर करत ज्येष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

संकर्षण कऱ्हाडेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘बाबा महाराज सातारकर.. फार वाटायचं कधीतरी तुमच्या समोर बसुन, प्रत्यक्ष तुम्हाला पहात, तुमचा अभंग, किर्तन, प्रवचन ऐकावं.. आता ती संधी नाही…. गळा भरून भरून आलाय.. माझ्या लहानपणी बाबांनी नवीन कॅसेट प्लेअर आणला होता.. त्यावर लावलेली पहिली कॅसेट बाबा महाराजांची “आम्ही दैवाचे दैवाचे”. ती ऐकतांना पहिल्यांदा मला “तुकोब्बा, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि “रूक्मीणी पांडूरंग” ह्यांची बाबा महाराजांच्या गोड आवाजांत “दास पंढरी रायांचे” हे ऐकत ओळख झाली .. आजी आजोबांनी अनेक वर्षं वारी केली.. चातुर्मासात चारही महिने पंढरपूरी मुक्कामी असायचे.. आल्यावर आजी म्हणायची; “काय सांगू तुम्हाला पोरांनो; बाबा महाराज प्रवचनात बोलतांना त्यांच्या तोंडातून शब्दं मोत्यांसारखे बाहेर पडतात आणि डोळ्यांत माणिक चमकतांत“ .. हे वर्णन ऐकून त्यांचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. तोच चेहरा डोळ्यासमोर आणुन रोज सकाळी त्यांच्या आवाजांत हरिपाठातल्या “बहुत् सुकृताची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी” हे ऐकतांना कित्ती गोड वाटतं काय सांगू ..?’

पुढे लिहिलंय, ‘प्रवचन करतांना एखाद्या वाक्यानंतर, “काय ….?” किंवा किर्तनात अभंग गातांना लय वाढवण्यासाठी केलेलं “हं हं हं हं” हे आपल्याला प्रत्येक क्षणाला गुंतवून ठेवतं, ठेवत राहील!! मला आजवर वारीला जाण्याचं भाग्यं नाही लाभलं पण, बाबा महाराजांनी मला आणि माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्या आवाजानी, स्वरांनी, श्रवणाने वारकरी केलंय.. आज ते आपल्यातनं गेले पण मी तरी ह्या जगांत आहे तोवर रोजची सकाळ त्यांच्या आवाजातल्या हरिपाठानेच सुरू करीन! आज बाबा महाराजांना भेटून साक्षात परमेश्वर पण त्यांच्याच आवाजांत ऐकुन पाठ केलेला अभंग म्हणत असेल; “धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंता जन्मीचा शीण गेला”