‘नथुराम गोडसे’ नाटकाच्या टीमसाठी संकर्षणचा खास व्हिडीओ; म्हणाला, ‘हे धाडसाचं काम..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संकर्षण कऱ्हाडे हा मराठी कलाविश्वात एक उत्तम अभिनेता, कवी आणि सूत्रसंचालक आहे. त्याने नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि अजूनही करतो आहे. सध्या त्याचं ‘तू म्हणशील तसं’, ‘नियम व अटी लागू’ ही नाटकं आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम रंगभूमीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांचे मन जिंकत आहे. अशातच संकर्षणने अभिनेता शरद पोंक्षे यांच्यासाठी एक खास व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. जी व्हायरल होताना दिसते आहे.

अभिनेते शरद पोंक्षे यांच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचा गेल्या २६ जानेवारी २०२४ रोजी शेवटचा प्रयोग पार पडला. या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतानाही काही इतर कारणांमुळे या नाटकाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यासंदर्भात संकर्षणने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो व्हिडीओ शरद पोंक्षे यांनी शेअर करत ‘संकर्षण किती सुंदर प्रतिक्रिया दिलीस मित्रा धन्यवाद’, असं कॅप्शन लिहिलं आहे. या व्हिडीओत संकर्षण म्हणतोय कि, ‘नमस्कार मी संकर्षण कऱ्हाडे. मी ”नथुराम गोडसे” या नाटकाच्या संपूर्ण टीमसाठी हा व्हिडीओ करतोय. तुम्ही आज हे नाटक आणि कलाकृती पूर्ण करताय. थांबताय, संपवताय असं चुकूनही म्हणणार नाही. तुम्ही कलाकृती पूर्ण करताय. याच्यानंतर आपल्या या कलाकृतीचा प्रयोग बघायला मिळणार नाही. हे फार धाडसाचं काम आहे’.

‘लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत असताना सुद्धा एखादी कलाकृती पूर्ण करणं, तिला पूर्णविराम देणं, हे धाडसाचं जास्त काम आहे. ऐरवी शुभारंभाच्या प्रयोगाच्या शुभेच्छा देतो तेही महत्त्वाचं आहे. ऐकवेळ शुभारंभाचा प्रयोग तुलनेने सोपा पण उदंड प्रतिसादाच्या महासागरात प्रयोग पूर्ण करणं, तो परत न करणं हे जास्त अवघड आहे. या चिकाटी आणि धाडसाबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार, तुमच्या टीमला सलाम. तुमच्यातल्या काही लोकांना मी वैयक्तिक ओळखतो राजेश कांबळे सर आहे, घाटे सर आहेत, पोंक्षे सर अर्थात आहेतच पण तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. ही कलाकृती आता इथे पूर्ण होतं असली तरी वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून आम्हाला भेटत राहा. या संपूर्ण टीमला मनापासून नमस्कार आणि अनंत शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी, धन्यवाद’. दरम्यान, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या शेवटच्या प्रयोगादिवशी शरद पोंक्षे यांनीदेखील भावुक पोस्ट लिहिली होती. जी व्हायरल होताना दिसली.