हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार आहे. तो उत्तम अभिनेता आहे, उत्तम वक्ता आहे, उत्तम लेखक- कवी आहे आणि तितकाच उत्तम सूत्रसंचालकसुद्धा. त्यामुळे सोशल मीडियावर संकर्षणचे चाहते नेहमीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात. सध्या संकर्षण ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे आणि या दरम्यान त्याने एक खास अनुभव सोशल मीडियावर आवर्जून शेअर केला आहे. डिजिटल युगात त्याच्या चाहत्यांनी त्याला पत्र लिहून पाठवली आहेत. जी वाचल्यानंतर त्याने हि पोस्ट शेअर केली आहे.
संकर्षण कऱ्हाडे हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. त्यामुळे तो नेहमीच विविध किस्से, आठवणी, फोटो, व्हिडीओ, प्रयोगांची माहिती सोशल मीडियावर देताना दिसतो. आताही त्याने चाहत्यांच्या पत्रांविषयी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे. त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत चाहत्यांची पत्र पहायला मिळत आहेत. संकर्षणला ही सर्व पत्र त्याच्या चाहत्यांनी पाठवली आहेत हे सांगताना त्याने लिहिलेलं कॅप्शन अत्यंत सुंदर आणि तितकंच खास आहे.
संकर्षणने लिहीलंय, ‘प्रेक्षकांचा प्रत्येक शब्द मोलाचा …. गेल्या काही महिन्यांत प्रेक्षकांनी प्रयोगाला येऊन मला अशी अनेक पत्रं दिली.. काही पत्रांमध्ये प्रचंड प्रेम होतं, कौतुक होतं, काहींमध्ये सुचना, भेटवस्तू आणि काहींमध्ये काळजी .. प्रेक्षकांचा हा प्रत्येक शब्दं माझ्यासाठी मोलाचा आहे म्हणुन मी ही सगळी पत्रं आज लॅमिनेट करुन आणलीयेत आणि त्याची फाईल तयार केली आणि आता ह्या सगळ्या पत्रांना मी माझ्या स्वतःच्या अक्षरांत पत्रं लिहूनच उत्तर देणार.. (माझं अक्षर नाहीच कळणार तरीही.. करा आता सहन) पण, मोलाची गोष्टं ही कि सेल्फीच्या जमान्यात हा पत्रं प्रपंच माझ्यात आणि प्रेक्षकांमध्ये होणार भेटूच..’ यापुढे त्याने नाटकाच्या पुढील प्रयोगांची माहिती दिली आहे.