हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चला हवा येउद्या या लोकप्रिय कॉमिक शोमधून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालणारा अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. गेली अनेक वर्ष तो आपल्या अभिनयाच्या आणि कॉमिक टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवतो आहे. त्याच्या विनोदी शैलीमुळे तो नेहमीच भाव खाऊन जातो. पण प्रेक्षकांना हसवणारा कुशल आजकाल सोशल मीडियावर बराच व्यक्त होतो आहे. त्याच्या अभिनयाइतकीच त्याच्या शब्दांना असलॆली धार आता आणखीच तीव्र होत चालली आहे. अशी शाब्दिक धार असलेली त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर त्याचा खास दोस्त संतोष जुवेकरने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता कुशल बद्रिके यान अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने एक फोटो शेअर केला आहे आणि सोबतच त्याने बालपणी ऐकली जाणारी एक गोष्ट सांगितली आहे. त्याने लिहलंय, ‘म्हातारीच्या कापसाची गोष्ट. लहानपणी, अलगद ओंजळीत झेललेल्या ”म्हातारीच्या कापसाला” मी हळूच फुंकर घालायचो की तो कापूस हवे सोबत उडत… उडत… जायचा मग पुन्हा अलगद त्याला ओंजळीत झेलायचं, पुन्हा फुंकर, पुन्हा हवा, तोच खेळ पुन्हा पुन्हा. मग कधीतरी जोराचा वारा यायचा आणि कुणास ठाऊक कुठे..? पण “म्हातारीचा कापूस” घेऊन लांब… उडून जायचा आणि मी… मी त्या उडत जाणाऱ्या “म्हातारीच्या कापसाकडे” नुसतं बघत रहायचो, असहायपणे तो दिसेनासा होईपर्यंत आणि मनात मात्र खूप दुःख- दुःख व्हायचं. त्यावेळी त्या “म्हातारीच्या कापसाने” मनाला झालेली जखम आजपर्यंत कोणत्याच कापसाने टिपता आली नाही मला’.
‘हल्ली, काही नाती सुद्धा त्या “म्हातारीच्या कापसासारखी” अलगद ओंजळीतून निसटून जात आहेत आणि मला मात्र पुन्हा लहान झाल्यासारखं झालंय, “उडून जाणाऱ्या म्हातारी कडे नुसतं बघत बसणारं एक लहान मुल’. कुशलची पोस्ट तुफान व्हायरल झाली असून यावर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण लक्ष वेधून घेतलं ते संतोष जुवेकरच्या कमेंटने. या पोस्टवरकमेंट करत संतोषने लिहिले, ‘तू आता फक्त २ बोटं उरलायस शाहरुख व्हायला, होशील लवकरच होशील. फक्त आता केस सतत डोळ्यावर येण्याची acting करत रहा’. कुशल आणि संतोष हे अत्यंत जवळचे असे खास मित्र आहेत. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या पोस्टवर अशाप्रकारे कमेंट करताना दिसतात.