‘होईल जनतेचं जे व्हायचं, आपल्याला काय…’; कवी सौमित्र यांची ‘ती’ कविता व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकीकडे राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. तर दुसरीकडे या विषयाचे आपल्या सोयीने राजकारण केले जात आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलीसांकडून लाठीमार करण्यात आला आणि त्यानंतर याचे अत्यंत गंभीर पडसाद उमटले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सर्वपक्षीय बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुरूवातीला तीनही नेते समोर आले असताना माईक सुरु असल्याने परिषदेपूर्वी त्यांचा आवाज रेकॉर्ड झाला होता.

या संवादामध्ये एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं’. यावर अजित पवार ‘हो.. येस’ असे म्हणाले आणि देवेंद्र फडणवीस ‘माईक चालू आहे’ असे सांगताना दिसले. हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आणि त्यानंतर मराठा समाजामधून संताप व्यक्त केला गेला. यावर प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम म्हणजेच कवी सौमित्र यांनी कवितेच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केलं आहे. अभिनेते किशोर कदम यांनी अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आपण बोलून निघून जायचं ..’ या शिर्षकाची कविता शेअर केली आहे.

शीर्षक : आपण बोलून निघून जायचं ..

होईल जनतेचं जे व्हायचं
आपल्याला काय..
आपण बोलुन निघुन जायचं… आपल्याला काय..

केवढी जनता असते समोर, आपल्या जीवाला नस्ता घोर
सगळेच पक्ष लावतात जोर, कोण साधून् कोण चोर

आपली तशीच विचारधारा, जिकडे जसा वाहिल वारा
घालत राहायच्या येरझारा, जातोच निसटुन हातुन पारा

हेच लक्षण लक्षात ठेऊन, आपण येत जात ऱ्हायचं
तहाने सारखं व्याकुळ व्हायचं, जकडे झरा तिथलं प्यायचं
आपल्याला काय… आपण पिउन निघुन जायचं

आपल्याला काय…

लोकांची पण सहनशक्ती, आपण ताणुन बघत नुस्ती
लाऊन द्यायची त्यांच्यात कुस्ती, कैसा गांव कैसी बस्ती

आपलेच सगळे कार्यकर्ते, आपले कर्ते आपले धर्ते
जिधर घुमाव उधर फिरते. त्यांच्या हातात काय उरते

उद्या परवा विचार करू, नंतर त्यांना काय द्यायचं
आधी बघू काय खायचं, लोकशाहीचंच गाणं गायचं
आपल्याला काय.. आपण गाउन निघुन जायचं

आपल्याला काय..

चोविस तास बातम्या मिळोत, चॅनल्स जाहिराती गिळोत
न्याय अन्यायाशी पिळोत, एफबी इन्स्टा सारे फळोत

खड्डे सगळे तसेच सडोत, निकाल लांबणीवरती पडोत
नशिबाशी कामं अडोत, नको तशा घटना घडोत

जे जे हवं ते ते द्यायचं, तेवढ्या पुरतं त्राता व्हायचं
कशालाही नाही भ्यायचं
आपल्याला काय.. वचनं देउन निघुन जायचं

आपल्याला काय..

रोज लोकां समोर यायचं
रोज लोकां समोर जायचं
माईक बंद चालू असो
आपण फक्तं बोलत ऱ्हायचं

आपल्याला काय ..

– सौमित्र.

सौमित्र यांची हि कविता अत्यंत व्हायरल होत असून चांगलीच चर्चेत आली आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो एडीट केलेला असल्याचं म्हटलं होतं. हा संवाद चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरवण्यात आलेला असून हा खोडसाळपणा आहे, मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत आम्ही काम करीत आहोत. तरीही मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते.