माझ्या सुनेच्या मंगळागौरीला गाणं गायला येशील का..?; सावनीने सांगितलं भन्नाट किस्सा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील ‘मंगळागौर’ हे गाणे तुफान लोकप्रिय ठरले आहे. या गाण्याची गायिका सावनी रविंद्र ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे. आतापर्यंत तिने अनेक दर्जेदार गाणी गायली आहेत. पण ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी तिने गायलेल्या ‘मंगळागौर’ गाण्याने महिला वर्गाचा चंगळच लक्ष वेधून घेतला आहे. मुख्य म्हणजे या गाण्यामुळे आता तिला मंगळागौरीच्या ऑफर्स यायला लागल्या आहेत. होय. याचा एक भन्नाट किस्सा सावनीने सांगितला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अलीकडेच ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला मिळालेले यश साजरे करण्यासाठी संपूर्ण टीमने एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या सोहळ्यात ‘मंगळागौर’ गायल्यानंतर सावनीसोबत जो भन्नाट किस्सा घडला तो तिने सांगितला. ती म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला एकदा सकाळी ८ वाजता एका आजोबांचा फोन आला. माझा नवरा आशिष त्यांना म्हणाला की, हा सावनीचा नंबर नाही. मी तिचा नवरा बोलतोय. त्यावर ते आजोबा म्हणाले की, तुम्ही तिला एक विचाराल का..? माझ्या सुनेची मंगळागौर आहे पुढच्या आठवड्यात. तर सावनी गाणी म्हणायला येऊ शकेल का..? त्यावर आशिष ब्लॅंक झाला. त्यामुळे आता असं सगळं झालं आहे’.

सावनीचा हा भन्नाट किस्सा आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण मजेची बाब सोडली तर सावनी रवींद्र ही अत्यंत गोड गळ्याची गायिका आहे. त्यामुळे तिने गायलेली गाणी हि नेहमीच प्रेक्षकांसाठी मधुर पर्वणी ठरतात. आताही तिने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी गायलेले ‘मंगळागौर’ हे गाणे अत्यंत सुंदर प्रभाव पाडताना दिसत आहे. गाण्यातील भाव आणि त्यातील विशेष बारकाई जाणून सावनीने हे गाणे गायल्यामुळे आज या गाण्याला युट्युबवर ६.५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे सावनीदेखील अत्यंत आनंदी आहे.