शंभराव्या नाट्य संमेलनात कलाकारांची गैरसोय; सविता मालपेकरांनी व्यक्त केली नाराजी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शंभराव्या अखिल भारतील मराठी नाट्यसंमेलनाचा औपचारिक उद्घाटन सोहळा रविवारी पिंपरी – चिंचवड येथे पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. यामध्ये राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि कलाविश्वातील मातब्बर कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मंडळींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांचादेखील समावेश होता. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली नाराजी व्यक्त केली आहे. नियोजनस्थळी कलाकारांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी खंत बोलून दाखवली.

यावेळी अभिनेत्री सविता मालपेकर म्हणाल्या कि, ‘शंभराव नाट्यसंमेलन ही रसिकांसाठी पर्वणी आहे, पण आम्हा कलाकारांसाठी नाही. इथे सगळाच सावळा गोंधळ सुरू असून गैरसोय आहे. कोणतीही सोय नाही, जेवायला जायला गाड्या नाहीत. मोहन जोशी, सुरेश खरे अशा वयस्कर ज्येष्ठ कलाकारांना अर्धा ते पाऊणतास बाहेर थांबवावं लागलं. संमेलनाच्या माजी अध्यक्षांना जेवताना बसायला जागा नव्हती अशाप्रकारचं हे संमेलन होतं. दरवर्षी अनेक कलाकार संमेलनाला येतात, भाषणं ऐकतात थोडावेळ बसले की, त्यानंतर उठून आपआपल्या कामाला जातात…कोणीही पूर्णवेळ थांबत नाही. फार थोडे कलाकार शेवटपर्यंत असतात याची मला खरंच खंत वाटते. एखाद्या आयोजकाने पूर्ण तयारी केली असेल, तर कलाकारांनी देखील वेळ देऊन थांबणं गरजेचं आहे’.

‘आयोजक असो किंवा कलाकार या सगळ्या गोष्टींची काळजी नाट्यसंमेलनाच्या काळात घेतली गेली पाहिजे. जर दोन दिवस संमेलन असेल, तर त्या दोन दिवसांत निर्मात्यांनी प्रयोग ठेऊ नयेत. कारण, शासन या सोहळ्यासाठी करोडो रुपये देतं आणि काही कलाकार फक्त हजेरी लावायला येतात. या पलीकडे काहीच करत नाहीत. संमेलनात अध्यक्षांचं भाषण सुरू असताना अनेक लोक उठून जातात ही गोष्ट एक कार्यकर्ती व सदस्य म्हणून मला पटत नाही. या पुढच्या सगळ्या आयोजकांना एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे, तुम्ही तुमच्या गावात संमेलनासाठी निमंत्रित करताना सर्वप्रथम व्यवस्था चांगली करा. जर व्यवस्था नीट नसेल तर शासन करोडो रुपये देतं त्याचं काय होतं? याचा विचार नक्की केला पाहिजे’.