कडू आज्जी बदलली..; ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकरांची एंट्री


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेत अभिनेता हर्षद अतकरी आणि अभिनेत्री शर्वरी जोग हे मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. त्यांच्या पात्रांची नावे कबीर आणि गुंजा अशी आहेत. या मालिकेचं कथानक छोट्याशा गावातल्या गुंजाभोवती फिरतं. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका चांगला जोर लावताना दिसते आहे. अशातच मालिकेतील एका अभिनेत्रीने एक्झिट घेतल्याचे समोर आले आहे.

‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेत हर्षद अतकरी, शर्वरी जोग यांच्याशिवाय पूर्णिमा डे, समिधा गुरू, राजन भिसे, नीता पेंडसे, प्रियंका नार, तनिष्का म्हाडसे, संजय खापरे अशी चांगलीच तगडी स्टारकास्ट पहायला मिळते आहे. दरम्यान या मालिकेत गुंजाला आणि बाभळीला प्रचंड त्रास देणारी जुनाट विचारांची, स्वार्थी, लोभी, कट कारस्थानी कडू आजीची भूमिका अभिनेत्री वसुधा देशपांडे साकारत होत्या. पण आता त्यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला असून हि भूमिका प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर साकारणार आहेत.

‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेतील जवळपास सर्व पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. मालिकेचे कथानक देखील चांगले रंगात आले आहे. असे यातना आता वसुधा देशपांडे यांची एक्झिट झाल्याने कुठेतरी कमीपणा निर्माण झाला होता. अशातच ही रिकामी जागा भरून सविता मालपेकर नव्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. यापूर्वीही त्यांनी ‘स्टार प्रवाह’वरील एका मालिकेत काम केलं आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत त्यांनी दमयंती पाटील (आजी) ही भूमिका साकारली होती.