सयाजी शिंदे साकारणार ‘कोसला’मधील पांडुरंग सांगवीकर; म्हणाले, ‘मी स्वतः या कादंबरीतील उतारे…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ हि कादंबरी साहित्य विश्वातील एक युग आहे. या कादंबरीचा मोठा वाचकवर्ग आहे. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यामध्ये लेखकाने मांडल्यामुळे ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. यामध्ये पांडुरंग सांगवीकर नामक एका तरुणाची कथा आहे. जो गावातून शिक्षणासाठी शहरात येतो. यावेळी त्याला कसे अनुभव येतात..? त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथे आलेले अनुभव यांचा प्रवास म्हणजे कोसला. लवकरच या कादंबरीवर आधारित चित्रपट येत आहे आणि त्यातील पांडुरंग हि मुख्य भूमिके अभिनेते सयाजी शिंदे साकारणार आहेत.

पांडुरंग सांगवीकर या तरुणाचा जीवनप्रवास सांगणारी ही कादंबरी आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच एका भव्य सोहळ्यात कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे आणि अभिनेता सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत ‘कोसला – शंभरातील नव्याण्णवांस…’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. यावेळी अच्युत पालव यांनी कॅनव्हासवर ‘कोसला’ची सुंदर कलाकृती साकारली. आदित्य राठी आणि गायत्री पाटील दिग्दर्शित हा चित्रपट निर्माण स्टुडिओज निर्मित असून याचे मेहुल शाह निर्माते आहेत.

दरम्यान या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले कि, ‘जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हाच ही कांदबरी आली होती. तेव्हा मी स्वतः या कादंबरीतील उतारे पाठ केले होते. बोलण्यासाठी आणि अभिनयासाठी त्याचा कसा वापर होईल, याचा विचार करायचो. त्यानंतर बराच काळ लोटला. अनेकांचा या कादंबरीवर चित्रपट करण्याचा विचार होता. याच दरम्यान मला मेहुल सरांचा फोन आला. आम्ही नेमाडे सरांसोबत एक- दोन मिटिंग केल्या आणि अखेर नेमाडे सरांनी ”कोसला”ला संमती दिली. सरांच्या सगळ्या नियमांचे पालन करत आता या चित्रपटाची सुरूवात होत आहे’.’