प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे निधन; पुण्यातील रुग्णालयात सुरु होते उपचार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी कला दिग्दर्शक नितीन देसाईं यांच्या आत्महत्येच्या मृत्यूने कलाविश्व हादरले. यानंतर आज प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा शबद घेतल्याचे समजत आहे. दरम्यान ते ८१ वर्षांचे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कवी ना. धों. महानोर हे गेल्या काही दिवसांपासुन किडनीच्या आजाराने त्रस्त होते. अचानक प्रकृती ढासळल्यामूळे त्यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारांना ते योग्य प्रतिसाद देऊ शकले नाहीत आणि साहित्य विश्वातील एक तारा निखळला. उद्या पळसखेड या त्यांच्या मुळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

नामदेव धोंडो महानोर यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. जेमतेम परिस्थिती असल्यामुळे आई- वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना ४ भाऊ आणि ३ बहिणी. यात महानोर सगळ्यांत थोरले. शेंदुर्णीच्या शाळेत असताना त्यांची कवितेसोबत गट्टी जमली आणि मग हीच गोडी त्यांनी जपली. गेल्या ६० वर्षाहून अधिक काळ ते साहित्य क्षेत्रात कार्यरत राहिले. म्हणूनच मराठी काव्यविश्‍वात ‘निसर्गकवी’ अशी त्यांची विशेष ओळख आहे. महानोर आणि शेती यांचे लहानपणापासूनच घट्ट नाते असल्यामुळे त्यांचा निसर्ग कवितांमधील रस वाढला. निसर्गाने प्रेरणा देत ना. धों. महानोर यांना ‘निसर्गकवी’ बनवले. त्यांच्या अद्भुत निसर्गकविता या कायम रसिकांसाठी पर्वणी ठरतात.