‘आरक्षणचा संघर्ष टाळायचा असेल तर..’; अभिनेत्याने शेअर केला विलासराव देशमुखांच्या भाषणाचा ‘तो’ व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर नेहेमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांमध्ये ते अत्यंत गुणी अभिनेते म्हणून कायम प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत आले आहेत. मात्र अभिनयापेक्षा जास्त त्यांच्या विचारसारणी आणि विधानांची चर्चा होते. अशातच त्यांनी राज्यातील राजकीय आणि सामाजिक सद्यपरिस्थितीवर भाष्य करणारा दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. जो चांगलाच चर्चेत आला आहे. जाणून घेऊया काय आहे या व्हिडिओत..?

जालन्यात शांततेत मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडल्यावर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. पोलिसांच्या कारवाईवर विविध माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पोंक्षे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये विलासराव देशमुख यांनी आरक्षणाच्या संदर्भात वक्तव्य केलं आहे. त्यावेळी विलासराव देशमुख म्हणाले होते कि, ‘जेव्हा जातीनिहाय आरक्षण देण्याचा प्रश्न येतो तेव्हा हा संघर्ष भविष्यामध्येही राहणारच… आणि म्हणूनच आर्थिक निकषांवर आधारित आपण सर्वांना सवलती देण्याचा विचार केला, तर लोक स्वत:ची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आज प्रत्येकजण माझी जात कोणती आणि मला सवलत कशी मिळेल या शोधात आहे. आरक्षणाच्या संदर्भात होणारा संघर्ष टाळायचा असेल, तर भविष्यात आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा विचार झाला पाहिजे’.

‘हा विचार फक्त एका राजकीय पक्षाला करून चालणार नाही. यासाठी सगळ्या राष्ट्रीय पक्षांनी एकत्र विचार करणं गरजेचं आहे. तरच आरक्षणासंदर्भातील संघर्ष टाळता येईल’. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जुन्या भाषणाचा हा व्हिडीओ शेअर करत शरद पोंक्षेंनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आज विलासरावांचं भाषण ऐकण्यासारखं आहे’. यासोबत कमेंट बॉक्समध्ये पोंक्षेंनी लिहिलंय, ‘मित्रांनो गंमत लक्षात आली का?विलासराव बोलले.कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री बोलले त्यामुळे आज विरोधक फारसे फीरकले नाहीत.किंवा तोंडात बोळा घालून गप्प आहेत.बापरे हे जर दूसरं कोणी बोलतं तर,? असंस्कृत शब्दांचा भडीमार झाला असता.हाच दूतोंडीपणा आहे. ह्यांना ० किंमत देतो मी म्हणूनच’.