अखेरचा राम राम नथुराम!! ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचा शेवटचा प्रयोग हाऊसफुल्ल; शरद पोंक्षे झाले भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या कट्टर सावरकरवादी विचारांमुळे चर्चेत असतात. कायम परखडपणे राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ते ओळखले जातात. शरद पोंक्षे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात आणि या माध्यमातून ते आपले विचार मांडताना दिसतात. नुकताच शरद पोंक्षे यांचं अजरामर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. हे नाटक जितकं गाजलं तितकंच वादातही राहिलं. ६ वर्षांपूर्वी या नाटकाचे प्रयोग थांबवण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी लोकाग्रहास्तव या नाटकाचे विशेष ५० प्रयोग आयोजित केले गेले.

नुकताच हा ५० प्रयोगांचा प्रवास थांबला आणि यावेळी प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद लाभला. नाटकाचा आणि प्रेक्षकांचा निरोप घेताना अभिनेते शरद पोंक्षे भावुक झाले आहेत आणि त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, ‘आज नथुराम गोडसेचा शेवटचा प्रयोग. माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व कलाकार तंत्रज्ञांनी हे पोस्टर बनवून कालीदास मुलुंडच्या गेटवर लावलं. हे त्यांना करावंसं वाटलं, एवढं प्रेम ते करतात म्हणूनच २५ वर्षे ही टीम टिकली. आता आज ४.३० ते ७.३० या वेळात शेवटचं नथुराम रूपात मी बोलेन, मग पूर्णविराम . मग नवीन नाटक ‘हिमालयाची सावली’ नोव्हेंबर २०२४ मध्ये घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद’.

अभिनेते शरद पोंक्षे यांनी हि पोस्ट अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर शेअर केली आहे. या नाटकादरम्यान शरद पोंक्षे याना अनेकदा धमकीचे फोन आले. मात्र त्यांनी या नाटकातील नथुराम चांगलाच वठवला. केवळ शरद पोंक्षे यांनी नव्हे तर या नाटकाच्या संपूर्ण टीमने न घाबरता या नाटकाचे प्रयोग पूर्ण केले. या नाटकाने एकूण १००० प्रयोग केले. मुख्य म्हणजे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर गोव्यातदेखील या नाटकाचे प्रयोग रंगले आणि हाऊसफुल्ल ठरले. प्रदीप दळवी लिखित या नाटकाचे दिग्दर्शन विनय आपटे यांनी केले होते आणि मध्यवर्ती भूमिका शरद पोंक्षे यांनी साकारली होती.