शरद पोंक्षेंच्या लेकीची गगनभरारी; परदेशात घेतले पायलट होण्याचे प्रशिक्षण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाइतकेच परखड स्वभाव आणि थेट विधाने करण्यासाठी ओळखले जातात. काही ना काही विषयांवर त्यांनी केलेली वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. पण आज त्यांच्या लेकीमुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरु झाली आहे. आपण अनेकदा पहिले असेल कि दिग्गज कलाकार मंडळींची मुलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतात आणि अभिनय विश्वात पदार्पण करतात. पण शरद पोंक्षे यांच्या लेकीने वेगळी वाट निवडली आणि यशाची पहिली पायरी चढली आहे. याबाबत स्वतः शरद पोंक्षे याची पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

अभिनेते शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी नुकतीच परदेशातून परतली आहे. माहितीनुसार, सिध्दीने परदेशात वैमानिक होण्याचे शिक्षण घेतले आहे आणि नुकतीच ती आपला अभ्यासक्रम पूर्ण करून देशात परतली आहे. आता सिद्धी एक वैमानिक झाली आहे. याचा तिच्या कुटुंबियांना आणि खास करून तिच्या वडिलांना म्हणजेच अभिनेता शरद पोंक्षे यांना प्रचंड आनंद झाला आहे. हा आनंद त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. शरद पोंक्षे यांनी नुकतीच याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

यामध्ये त्यांनी लिहिलंय, ‘कु. सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून, माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत.. कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली. बापाला आणखी काय हव नाही का..? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा’. सिद्धीच्या या यशासाठी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.