एक पुरुष आणि सात बायकांची धमाल गोष्ट घेऊन येतोय ‘इंद्रधनुष्य’; लंडनमध्ये शूटिंग सुरु


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मनातल्या उन्हात’, ‘ड्राय डे’, ‘भारत माझा देश आहे’ असे उत्तम आशयसंपन्न चित्रपट दिग्दर्शित केलेले पांडुरंग जाधव आता ‘इंद्रधनुष्य’ हा नवा चित्रपट लंडनमध्ये चित्रीत करत आहेत. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशीसह सागर कारंडे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी दमदार स्टारकास्ट आपल्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त करण्यात आला आहे.

आशिष अग्रवाल यांच्या एबीसी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून ‘इंद्रधनुष्य’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. तर नितीन वैद्य हे या चित्रपटाचे सह निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन पांडुरंग जाधव यांची आहे. तसेच पटकथादेखील पांडुरंग जाधव यांचीच आहे. तर संवाद लेखन विपुल देशमुख यांचे आहे. नागराज दिवाकर हे छायांकन, वरुण लखाते संगीत दिग्दर्शनाची तर निलेश गावंड संकलनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. चित्रपटाची कथा एक पुरुष आणि सात बायका या कथानकावर आधारित असून अतिशय धमाल आणि मनोरंजक अशी आहे.

माहितीनुसार, लंडनमध्ये घडणाऱ्या या कथानकावरील चित्रपटाचं चित्रीकरण आता लंडनमध्ये सुरू झालं आहे. या चित्रपटामुळे अभिनेता स्वप्नील जोशी पहिल्यांदाच लंडनमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव घेत आहे. पांडुरंग जाधव यांनी आतापर्यंत केलेले तीनही चित्रपट उत्तम गोष्ट सांगणारे असल्यामूळे ‘इंद्रधनुष्य’ या चित्रपटातही त्यांच्या दिग्दर्शनाचे आणि सर्व स्टार कास्टच्या अभिनयाचे सप्तरंग दिसतील याची नक्कीच खात्री आहे.