नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुरु; सोशल मीडियावर मुहूर्ताचे फोटो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर भक्कम स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नाना पाटेकर हे अभिनय विश्वातील विद्यापीठ असे म्हटले जाते. नाना पाटेकरांनी आजपर्यंत नायक, खलनायक, विनोदी अशा विविध जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे नानांच्या आगामी सिनेमाबाबत कायम प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. अशातच नाना येत्या काळात आणखी एक सिनेमा घेऊन येत आहेत. ज्याच्या शूटिंगला सुरुवात झाली आहेत.

बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या ‘गदर 2’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या आगामी सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. माहितीनुसार, या सिनेमाचे नाव ‘जर्नी’ असे आहे. या सिनेमाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली असून सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. या सिनेमात नाना पाटेकर यांच्यासोबत उत्कर्ष शर्मादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर फोटो शेअर करत शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘जर्नी’ हा सिनेमा मुलगा आणि वडिलांच्या संवेदनशील नात्यावर आधारित आहे. ज्यामध्ये वडिल आणि मुलाचे नाते कसे असते..? हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे, येत्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नाना पाटेकर यांच्या या नव्या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.