श्रेया बुगडेला सीएम शिंदेंकडून खास दिवाळी गिफ्ट; अभिनेत्रीने शेअर केला फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सर्वत्र जगभरात दिवाळीची तयारी जोरदार सुरु आहे. सर्वत्र दिव्यांची रोषणाई, कंदील, फटाके, रांगोळी यांसह फराळ, मिठाईचे सुगंध दरवळत आहेत. आता येत्या आठवड्याभरात दिवाळीचा हा माहोल सर्वत्र आनंदी आनंद पसरवेल. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलाकार मंडळींना खास भेटवस्तू पाठवल्या आहेत. यात लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडेचा समावेश आहे.

श्रेया बुगडे हि ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमिक कार्यक्रमातून प्रकाशझोतात आलेली विनोदी अभिनेत्री आहे. आज आघाडीच्या विनोदी कलाकारांमध्ये श्रेया बुगडेच्या नावाचा समावेश आहे. मराठी सिनेसृष्टीत तिने स्वबळावर स्थान निर्माण केले असून प्रेक्षकांच्या मनातदेखील स्वतःची जागा तयार केली आहे. या गुणी अभिनेत्रीवर संपूर्ण महाराष्ट्र जीव ओवाळून टाकतो. अशा श्रेयाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास दिवाळी गिफ्ट पाठवून तिला या मंगलमय सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री श्रेया बुगडे हिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या गिफ्टची चाहत्यांना झलक दाखवली आहे. मुख्यमंत्र्यांनी श्रेयाला ही भेटवस्तू पाठवत दीपावली आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेयाने ही भेट स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त अनेक कलाकार मंडळी मुख्यमंत्र्यांच्या घरी वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. यामध्ये श्रेया बुगडेचादेखील समावेश होता.