महेश मांजरेकरांच्या चित्रपटात श्रेयस तळपदेची वर्णी; घेऊन येतायत नवी प्रेमकहाणी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा लवकरच एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेदरम्यान चित्रपटात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार याबाबत माहिती देण्यात आली आहे.

‘हि अनोखी गाठ’ या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याच्यासोबत अभिनेत्री गौरी इंगवले मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा आणि पटकथा हि महेश मांजरेकर यांचीच आहे. तर चित्रपटाचे संवाद गणेश मतकरी यांचे आहेत. ‘ही अनोखी गाठ’च्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही दिग्दर्शक- अभिनेत्याची नवी जोडी एकत्र येत आहेत. हा चित्रपट येत्या १ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाविषयी दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले कि, ‘झी स्टुडिओजसोबत या आधीही अनेकदा काम केले असून पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आलो आहे. श्रेयस आणि गौरी यांची केमिस्ट्री पाहणे औस्तुक्याचे ठरेल. हळूहळू चित्रपटातील गोष्टी समोर येतीलच’. तर झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणाले कि, ‘झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट घेऊन येत असते. झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक समीकरण झाले आहे. त्यामुळे यांच्यासोबत प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी प्रेमकहाणी घेऊन येण्यास आम्ही सज्ज झालो आहोत’.