‘माझ्या हृदयाची धडधड थांबली होती…’; ‘त्या’ दिवसाबद्दल श्रेयस तळपदेची पहिली प्रतिक्रिया समोर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेसृष्टीचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदेला १४ डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्याची अँजिओप्लास्टीदेखील करण्यात आली. डिस्चार्जनंतर श्रेयस त्याच्या घरीच आराम करत आहे. दरम्यान याबाबत श्रेयसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या घटनेमुळे आरोग्य हीच संपत्ती आहे, हे कळून चुकल्याचं श्रेयसने म्हटलं आहे. एका मुलाखतीत त्याने या प्रसंगाविषयी वाच्यता केली आहे. जाणून घेऊया काय म्हणालाय श्रेयस…

अभिनेता श्रेयस तळपदेने एका नामवंत वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला कि, ‘माझ्या आयुष्यात याआधी मला कधीही हॉस्पिटलमध्ये दाखल केलं नव्हतं. अगदी फ्रॅक्चरसाठीही नाही, त्यामुळे असं काहीतरी घडू शकतं असं वाटलं नव्हतं. पण आता इतकंच सांगेन की तुमच्या आरोग्याला गृहीत धरू नका. आरोग्य हीच संपत्ती आहे. अशा अनुभवामुळे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मी १६ व्या वर्षी थिएटर करण्यास सुरुवात केली, २० व्या वर्षी एक व्यावसायिक अभिनेता बनलो आणि गेल्या २८ वर्षांपासून मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. आपण आपल्या कुटुंबाला गृहीत धरतो. आम्हाला वाटतं की आमच्याकडे वेळ आहे. पण आपण काळजी घेत नाही’.

‘गेल्या अडीच वर्षांपासून मी न थांबता काम करत आहे. मी शूटिंग व शोसाठी खूप प्रवास करतोय. पण, गेल्या काही महिन्यांपासून मला खूप थकवा जाणवत होता. हे थोडंसं असामान्य होतं. परंतु मी नॉनस्टॉप काम करत असल्याने कदाचित थकवा जाणवत असावा, असं मला वाटलं. मी जे करत होतो ते आवडत होतं म्हणून मी पुढे जात राहिलो. अर्थात, मी स्वतःची तपासणी करून घेतली होती. मी ECG, 2D इको, सोनोग्राफी आणि रक्ताच्या चाचण्या केल्या होत्या. माझे कोलेस्ट्रॉल जास्त होते आणि त्यासाठी मी औषधं घेत होतो. मला हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास आहे म्हणून मी जास्त खबरदारी घेत होतो’.

हार्ट अटॅक आला त्या दिवसाबाबत बोलताना श्रेयस म्हणाला, ‘आम्ही मुंबईत जोगेश्वरीजवळील SRPF मैदानावर ”वेलकम टू द जंगल”साठी शूटिंग करत होतो. दोरी पकडून चालणे, पाण्यात पडणे असे आर्मी ट्रेनिंगचे सीन आम्ही करत होतो, सर्व काही सुरळीत चालू होतं आणि अचानक शेवटच्या शॉटनंतर मला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि माझा डावा हात दुखू लागला. मी फक्त माझ्या व्हॅनिटी व्हॅनकडे जाऊ शकलो आणि माझे कपडे बदलू शकलो. आम्ही अ‍ॅक्शन सीक्वेन्स शूट करत असल्याने मला त्रास होतोय असं वाटलं. अशावेळी तुम्ही सर्वात वाईट परिस्थितीचा विचार करत नाही. असा थकवा मी कधीच अनुभवला नव्हता. मी कारमध्ये चढताच मला वाटलं की मी थेट हॉस्पिटलला जावं, पण आधी घरी गेलो. माझी पत्नी दीप्ती हिने मला त्या अवस्थेत पाहिलं आणि १० मिनिटांतच आम्ही हॉस्पिटलकडे निघालो’.

‘आम्ही तिथे पोहोचलो होतो आणि हॉस्पिटलचे गेट दिसत होते, पण तिथे प्रवेशबंदी होती आणि आम्हाला यू- टर्न घ्यावा लागला. पुढच्याच क्षणी माझा चेहरा सुन्न झाला आणि मी पडलो. तो हृदयविकाराचा झटका होता. त्या काही मिनिटांसाठी माझ्या हृदयाची धडधड थांबली होती. आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे दीप्तीला तिच्या दरवाजाच्या बाजूने कारमधून बाहेर पडता आले नाही, म्हणून ती माझ्या बाजूने आली आणि मदतीसाठी हाक मारण्यासाठी दुसऱ्या बाजूला गेली. काही लोक आमच्या मदतीला आले आणि मला आत नेले. डॉक्टरांनी सीपीआर, इलेक्ट्रिकल शॉक देऊन मला जिवंत केले. मी शुद्धीवर आलो, तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की मी त्यांच्याकडे पाहून हसलो. माझ्या पत्नीला या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागलं, त्यासाठी मी तिची माफी मागितली. नंतर मला पाच दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. आता मी विश्रांती घेत आहे’.

‘डॉक्टर म्हणाले की ६ आठवड्यांनंतर मी कामावर परत जाऊ शकेन. माझ्या निर्मात्यांनीही मला आराम करायला सांगितलं. सध्या मला कुटुंबासोबत राहायचे आहे, माझ्या मुलीसोबत मला वेळ घालवायचा आहे, काही चित्रपट बघायचे आहेत आणि पुस्तकं वाचायची आहेत. खरं तर जेव्हा असं काही घडतं तेव्हा तुमच्या कुटुंबाला सर्वात जास्त त्रास होतो. ”कुली”च्या सेटवर बच्चन साहेबांना दुखापत झाली तेव्हा त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती काय असेल याची मी आता कल्पना करू शकतो. वैद्यकीयदृष्ट्या मी मृत होतो. (क्लिनिकली डेड किंवा वैद्यकीयदृष्ट्या मृत या स्थितीत माणसाच्या शरीरातील रक्ताभिसरण आणि श्वसन यंत्रणा बंद पडते) हा एक मोठा हृदयविकाराचा झटका होता. मला आयुष्यात मिळालेली ही दुसरी संधी आहे. माझा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्येकाचा मी किती आभारी आहे हे मी सांगू शकत नाही. आणि अर्थातच माझी सुपरवुमन पत्नी, जिने मला वाचवण्यासाठी तिला जे जमलं ते सर्व केलं. तिच्यामुळेच मी आज बोलू शकतोय. या लोकांनी मला दुसरं जीवन दिलं आणि हे एक ऋण आहे जे मी कधीही फेडू शकणार नाही’.