मालिकेसाठी काय पण!! सीनसाठी अभिनेत्रीने हातावर ठेवला पेटता कापूर; नेटकरी म्हणाले, ‘बापरे!! किती रिस्क..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखादा कलाकार आपले काम पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी कायम धडपडत असतो. कामातील खरेपणा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी हि कलाकार मंडळी काहीही करायला तयार असतात. आजारपणात शूटिंग, पावसात भिजणं, स्टंट करणं, दुखापत होऊनही शूटिंग पूर्ण करणं अशी अनेक उदाहरणे आपण ऐकली वा पाहिली असतील. दरम्यान झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील एका सीनसाठी अभिनेत्रीने हातावर पेटता कापूर ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत.

झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ हि मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. मालिकेचा टीआरपी देखील उत्तम आहे. या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड भावले आहे. दरम्यान या मालिकेत अभिनेत्री श्वेता मेहंदळे ‘इंद्राणी’ हे पात्र साकारते आहे. जिला दिव्य शक्ती आहे पण ती मालिकेतील खलनायिकेसोबत मिळालेली आहे. असे असले तरीही देवीची निस्सीम भक्त असल्यामुळे तिलाही कुठेना कुठे सीमा आहेतच. तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत असताना एका सीनसाठी तिने चक्क हातावर कापूर पेटवून शूटिंग पूर्ण केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ अभिनेत्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ मालिकेचा BTS व्हिडिओ आहे. यामध्ये श्वेता देवासमोर हातात पेटता कापूर ठेवून बसलेली दिसत आहेत. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘उरी कल्लोळ उठला…’. तिचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकही थक्क झाले आहेत. सगळेच तिच्या डेडिकेशनचे कौतुक करत आहेत. याचबरोबर अनेकांनी प्रेम आणि काळजीपोटी तिची विचासरपूस केली आहे. तर अनेकांनी ‘बापरे.. यात खूप रिस्क आहे’, ‘मानलं तुला..’, ‘कमाल केलीस.. खूपच भारी’ असे म्हणत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.