हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर हे कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. हे जोडपं त्यांच्या रोमँटिक लव्हस्टोरीमुळे आणि बोल्ड फोटोंमूळे कायम चर्चेत असतात. पण यावेळी ते एका अत्यंत वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. नुकतंच सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यांचे दुसरे लग्न पार पडले. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. आपल्या आईचे लग्न लावून देण्यासाठी सिद्धार्थने पुढाकार घेतला आणि त्याच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर आईच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘हॅपी सेकंड इनिंग आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! आय लव्ह यू आई! हॅपी मॅरीड लाईफ!!’
तर आपल्या सासूबाईंच्या लग्नात सून मिताली मयेकरनेदेखील हौस मौज केली. सासुबाईंच्या लग्नाचे फोटो शेअर करत तिने म्हटले कि, ‘हॅपी मॅरीड लाईफ सासूबाई!! माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते..? खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा. आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम’. सीमा चांदेकर यांच्या लग्नाचे फोटो पाहताच नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी आणि कलाकार मंडळींनी सिद्धार्थच्या निर्णयाचे कौतुक करत त्याच्या आईचे नव्या जीवन प्रवासासाठी अभिनंदन केले आहे.