‘माझ्या आयुष्यात एकाही पुरुषाचा प्रभाव नव्हता’; ‘झिम्मा 2’मधील भूमिकेविषयी बोलताना सिद्धार्थने केला खुलासा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटातील बायकांचं रियुनियन प्रेक्षकांना भारी आवडलं. यामध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या अभिनेत्री झळकल्या. या गुणी अभिनेत्रींसोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने देखील अत्यंत महत्वाची भूमिका यामध्ये साकारली आहे. त्याच्या भूमिकेचे नाव ‘कबीर’ असून यानेच चित्रपटातील या सात बायकांचं रियुनियन घडवून आणलंय. या भूमिकेसाठी सिद्धार्थचे कौतुक सुरु असताना त्याला कबीरविषयी काय वाटत..? हे जाणून घेऊया.

अलीकडेच ‘झिम्मा २’च्या टीमने एका नामवंत वाहिनीला मुलाखत दिली. दरम्यान अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ‘कबीर’ या भूमिकेविषयी बोलताना दिसला. सिद्धार्थ म्हणाला कि, ‘कबीर या पात्राचं सध्या प्रचंड कौतुक होतंय. त्यामुळे एकंदर मला खरंच खूप भारी वाटतंय. पण, हे पात्र मी एवढ्या उत्तमरित्या साकारु शकलो याचं संपूर्ण श्रेय मी तुम्हा स्त्रियांना देईन. कारण, माझं आणि हेमंतचं सांगायचं झालं, तर आमच्या आयुष्यातील स्त्रियांनी आम्हाला वाढवलंय. माझ्या आयुष्यात आतापर्यंत एकाही पुरुषाचा प्रभाव नव्हता. लहानपणी मला माझ्या आईने गोष्टी शिकवल्या, मग बहीण होती, माझ्या दोन्ही कडच्या आज्या, त्यानंतर माझी बायको माझ्या आयुष्यात आली अर्थात या सगळ्या स्त्रियांनी माझं आयुष्य भरलेलं आहे. त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या’.

पुढे म्हणाला, ‘या सगळ्या जणींबरोबर राहून मला एक गोष्ट उत्तम जमते ती म्हणजे, मला स्त्रियांचे डोळे खूप चांगले ओळखता येतात. स्त्रियांचे डोळे क्षणोक्षणी बदलत राहतात. ते डोळे योग्यवेळी वाचता आले पाहिजेत. जर त्यांचे डोळे तुम्ही वाचलेत, तर एक पुरुष म्हणून तुम्हाला अगदी पटकन कळेल की, केव्हा एखाद्या स्त्रीला आपली गरज आहे आणि केव्हा नाहीये. माझ्या आयुष्यात एवढ्या स्त्रियांचा प्रभाव असल्यानेच मी कबीर हे पात्र अगदी उत्तमरित्या आणि अगदी सहज साकारु शकलो. अर्थात हेमंतने सुद्धा कबीर हे पात्र अगदी तसंच छान लिहिलंय. कारण, त्याच्या आयुष्यात सुद्धा स्त्रियांचा प्रभाव सर्वाधिक आहे’.